Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाच्या बॅगेची 70 लाखांची चोरी! लंडन विमानतळावर घडली धक्कादायक घटना

Urvashi Rautela: बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण तिचे ग्लॅमरस लूक किंवा वक्तव्य नाही, तर लंडन विमानतळावर तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक चोरीची घटना आहे. तिची तब्बल 70 लाख रुपयांची महागडी बॅग चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
उर्वशी नुकतीच विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला गेली होती. ती एमिरेट्स एअरलाइन्सने मुंबईहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर पोहोचली. इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती सामानासाठी बॅगेज बेल्टजवळ पोहोचली. मात्र तिथे तिची ‘क्रिश्चियन डिओर’ ब्रँडची महागडी लक्झरी बॅग कुठेच दिसून आली नाही.
तिने तात्काळ विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तब्बल एक तास शोधाशोध केली, मात्र तिच्या बॅगेचा काहीच पत्ता लागला नाही. या बॅगेत सुमारे 70 लाख रुपयांचे दागिने, किंमती अॅक्सेसरीज आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या,अशी माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे.
उर्वशीने या घटनेविषयी एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. ती म्हणाली की, “ही घटना अत्यंत धक्कादायक होती. माझ्यासाठी ही केवळ बॅग नव्हती, तर त्यात अनेक जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी होत्या.”
दरम्यान, लंडन विमानतळ प्रशासनाने याबाबत तपास सुरू केल्याची माहिती असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. उर्वशी रौतेला सध्या सुरक्षित असून, ही घटना अनेकांना धक्का देणारी ठरली आहे.
फॅशन आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या उर्वशीसाठी ही घटना नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. चोरीला गेलेली रक्कम आणि वस्तूंची किंमत लक्षात घेता, हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्यासोबत सहानुभूती व्यक्त केली आहे.





