UPW vs MI : हरलीन देओलचं वादळ! यूपी वॉरियर्सचा मुंबईवर दणदणीत विजय; सलग ३ पराभवांनंतर उघडलं विजयाचं खातं

UPW vs MI UP Warriorz Beat Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये यूपी वॉरियर्सने अखेर विजयाची चव चाखली आहे. सलग तीन पराभवांच्या धक्क्यातून सावरत यूपीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयाची खरी मानकरी ठरली ती म्हणजे हरलीन देओल, जिच्या नाबाद ६४ धावांच्या खेळीसमोर मुंबईचे आव्हान फिके पाडले.
हरलीनची फटकेबाजी आणि ट्रियोनची साथ –
मुंबईने विजयासाठी दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात संथ झाली. मेग लॅनिंग (२५) आणि किरण नवगिरे (१०) स्वस्तात बाद झाल्यानंतर फोएबे लिचफील्डने (२५) हरलीनला चांगली साथ दिली. मात्र, खरी रंगत शेवटच्या काही षटकांत पाहायला मिळाली. हरलीन देओलने ३९ चेंडूत १२ चौकार ठोकत नाबाद ६४ धावा कुटल्या. तिला क्लोए ट्रियोनने (११ चेंडूत २७ धावा) विस्फोटक साथ दिली, ज्यामुळे यूपीने १८.१ षटकांतच विजय मिळवला.
A clinical chase 💛@UPWarriorz open their account in #TATAWPL 2026 with a 7⃣-wicket victory over #MI 🥳
Scorecard ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/GGv6bEH8Ld
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026
मुंबई इंडियन्ससाठी ब्रंटने दिली झुंज
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६१ धावा केल्या होत्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीत हरमनप्रीत कौर (१६) मोठी खेळी करू शकली नाही. अखेरच्या षटकांत नताली सिव्हर ब्रंटने ४३ चेंडूत ६५ धावांची दमदार खेळी केली, तर निकोला कॅरीने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. यूपीकडून दीप्ती शर्मा, शिखा पांडे, सोफी एक्लेस्टोन आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
डब्ल्यूपीएलच्या गुणतालिकेतील संध्याची स्थिती –
- यूपी वॉरियर्स: ४ सामन्यांत १ विजय आणि ३ पराभवांसह संघ अजूनही पाचव्या स्थानावर आहे.
- मुंबई इंडियन्स: ४ सामन्यांत २ विजय आणि २ पराभवांसह मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे (आरसीबी अव्वल स्थानी).





