Pune District : घोडगंगा कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ
Pune District : दरम्यान, अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी या गोंधळासाठी विरोधी गटातील मोजक्याच तीन-चार सभासदांना जबाबदार धरले.

न्हावरे : येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावरून शिरूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. घोडगंगा कारखाना सहकारीच राहणार असून, खासगीकरणाचा प्रश्नच नाही,” असा स्पष्ट दावा कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी केला. मात्र, अध्यक्षांच्या या घोषणेनंतरही कारखान्याच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रश्नांना आणि चर्चेला अपेक्षित वाव मिळण्याआधीच गोंधळ, शाब्दिक चकमकी, घोषणाबाजी झाली. अखेर सभा कोणताही ठोस निर्णय न घेता राष्ट्रगीताने आटोपती घ्यावी लागली.
दरम्यान, अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी या गोंधळासाठी विरोधी गटातील मोजक्याच तीन-चार सभासदांना जबाबदार धरले. त्यांच्या गोंधळामुळे सभा आटोपती घ्यावी लागल्याचा आरोप त्यांनी केला. न्हावरे येथील कन्यादान मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सभासदांसह तालुक्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले होते. मात्र सभेच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या गोंधळामुळे वातावरण तापले. उपाध्यक्ष पोपट भुजबळ प्रास्ताविक करत असतानाच काही सभासदांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी अध्यक्ष व माजी आमदार ॲड. अशोक पवार, संचालक तथा माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, विश्वास ढमढेरे, महेश ढमढेरे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू करण्यात आली.
‘सहकारातूनच घोडगंगा सुरू करणार’
अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी कारखान्याच्या भवितव्याबाबत सत्ताधारी संचालक मंडळाची भूमिका स्पष्ट केली. घोडगंगा कारखाना खासगीकरणाच्या दिशेने जाणार नसून सहकाराच्या माध्यमातूनच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कारखान्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असून, वरिष्ठ पातळीवरील विविध पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची भावना असल्याचा दावा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ, बाबासाहेब पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानले.
विषयपत्रिका वाचली; प्रश्न उपस्थित झालेच
प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू केले. यावेळी सुधीर फराटे, काकासाहेब खळदकर, सुरेश पालांडे, किशोर फराटे आणि तात्या शेलार यांनी चर्चेत सहभाग घेतला. मात्र चर्चेदरम्यान काही सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सभेचे वातावरण पुन्हा तापले. अखेर सभेतील गोंधळ वाढल्याने महत्त्वाचे विषय आणि सभासदांची चर्चा पूर्ण होण्याआधीच सभा गुंडाळावी लागली.
सभागृहातील गोंधळानंतर सभेबाहेरही संघर्ष
विशेष म्हणजे वार्षिक सभा संपल्यानंतर कारखान्याच्या विरोधी गटाने सभास्थळाबाहेर स्वतंत्र निषेध सभा घेतली. त्यामुळे गोंधळ केवळ सभागृहापुरता मर्यादित राहिला नाही; तर घोडगंगा कारखान्यातील सत्ताधारी विरुद्ध सत्ताविरोधक संघर्ष सभागृहाबाहेरही उघडपणे दिसून आला. निषेध सभेला दादापाटील फराटे, बाबासाहेब फराटे, आबासाहेब गव्हाणे, काकासाहेब खळदकर, शशिकांत दसगुडे, सुधीर फराटे, राजेंद्र जासूद, श्रीनिवास घाडगे, बाळासाहेब घाडगे, सचिन मचाले, बबन वाळके, तात्या शेलार यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला.





