Pune District : शिरूर तालुक्यात कायद्याचा धाकच उरला नाही
Pune District : अवैध शस्त्रे तरुणांच्या हातात सहज पोहोचत असतील, तर ही बाब केवळ पोलिसांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे.

शिरूर : शिरूर तालुक्यात वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गावोगावी अवैध कट्टे आणि पिस्तुले तरुणांच्या हातात दिसत असून, किरकोळ वादातून थेट गोळीबार करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘शिरूरमध्ये कायद्याचा धाक उरलाय का?’ असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वेगाने वाढत असताना गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. पूर्वीच्या किरकोळ वादांना आता धमकी, मारामारी आणि शस्त्रांच्या वापराचे स्वरूप येत असल्याचे काही प्रकरणांत दिसून येते. अवैध शस्त्रे तरुणांच्या हातात सहज पोहोचत असतील, तर ही बाब केवळ पोलिसांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
एखाद्या गुन्ह्यात कट्टा किंवा पिस्तूल जप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन हे शस्त्र त्याच्यापर्यंत पोहोचले कसे, त्याचा पुरवठा कोणी केला आणि या मागे कोणती साखळी कार्यरत आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे. तरुणांच्या हातात पुस्तक, रोजगार आणि कौशल्य असण्याऐवजी अवैध शस्त्र पोहोचत असेल तर ही केवळ पोलिसांची नव्हे, तर समाजाचीही चिंता आहे.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये गस्त वाढवणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर कायदेशीर देखरेख ठेवणे आणि नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीची गोपनीयता राखून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर आरोपी पकडणे महत्त्वाचे आहेच; मात्र गोळीबाराची वेळ येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पोलिसिंग अधिक प्रभावी ठरणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर दहशत चिंताजनक
अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींपर्यंत तपासाची साखळी पोहोचली तरच ‘कट्टा संस्कृती’ला आळा घालता येईल. अन्यथा एक कट्टा जप्त झाला तरी दुसरा कट्टा बाजारात येण्याची शक्यता कायम राहणार आहे. सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे फोटो, व्हिडिओ आणि शस्त्रांचे प्रदर्शन करण्याची प्रवृत्तीही चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पशा कारणावरून मित्रांमध्ये किंवा टोळक्यांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ शकते.





