Pune district : अप्पर तहसीलदारांची आंदोलकांशी चर्चा; बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच

वाघोली : गेल्या 30 वर्षापासून दगडखाण कामगार आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी दगडखाण कामगार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड. बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका अँड. पल्लवी रेगे यांचा संघर्ष सुरू असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाघेश्वर नगर येथे चालू असलेला बेमुदत अन्न त्याग उपोषण गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी भर दिवाळीत सुट्टी असतानाही सत्याग्रह स्थळी भेट देऊन अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत विनंती केली.
जिल्हाधिकारी यांच्याशी (दि.2४) बैठक आयोजित केली असून बैठकीमध्ये दगडखाण कामगारांना व अदिवासींचा सातबारा व प्रॉपर्टी कार्ड निश्चित देऊअसे आश्वासन त्यांनी याप्रसंगी त्यांनी दिले आहे.
जोपर्यत शासन निर्णयानुसार ठोस अंमलबजावणी होत नाहीत. तोपर्यंत बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह थांबणार नाही, असा सर्वांचा ठाम निर्णय असल्याचे अँड. बी. एम रेगे यांनी सांगितले. माजी उपसरपंच शांताराम कटके, खराडी भागातून बेबी बोकले, संजय गायकवाड, यशवंत खरोटे, सुरेखा गायकवाड, कांताबाई करोटे आदींनी सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा दिला. वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, माजी सरपंच शिवदास उबाळे, पंचायत समिती हवेलीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच संजय सातव पाटील, मीना सातव पाटील आदी मान्यवरांनी भेटी देत आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने दगडखाण कामगार व अदिवासी आंदोलनात सहभागी झाले आहेत.





