UPI: भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असून यूपीआय ने पुन्हा एकदा मोठा विक्रम केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान यूपीआयद्वारे तब्बल ३०८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हा आकडा देशातील डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक मानले जात आहे. विशेष म्हणजे मार्च २०२६ महिन्यात यूपीआयने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या महिन्यात एकूण व्यवहारांची किंमत जवळपास २९.५३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच ३० लाख कोटींच्या आकड्याला स्पर्श करण्याच्या अगदी जवळ पोहोचले. याच काळात दररोज सरासरी १ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले, जे अत्यंत मोठे प्रमाण आहे. पूर्ण वर्षाचा विचार केला, तर दररोज सरासरी ८४,५०० कोटी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे झाले. यावरून डिजिटल व्यवहारांबद्दल लोकांचा वाढता विश्वास स्पष्ट दिसून येतो. छोटे-मोठे सर्व व्यवहार आता सहजपणे मोबाईलद्वारे करता येत असल्यामुळे यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. UPI payments ट्रांजेक्शनच्या संख्येमध्येही मोठी वाढ दिसून आली आहे. मार्च २०२६ मध्ये यूपीआयवर २२.६ अब्ज व्यवहार झाले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा वाढून २४१.६ अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचला. मागील वर्षाच्या तुलनेत यात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. यूपीआयच्या वाढीमध्ये व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या पेमेंट्सचा मोठा वाटा आहे. एकूण व्यवहारांपैकी सुमारे ६२ टक्के व्यवहार हे मर्चंट पेमेंट्सचे आहेत. यामध्ये ८६ टक्के व्यवहार हे ५०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे आहेत. तसेच ५०० ते २००० रुपयांदरम्यानचे व्यवहार सुमारे १० टक्के आहेत. यावरून छोट्या व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसते. तरीही, व्यवहारांच्या एकूण किमतीच्या बाबतीत पर्सन-टू-पर्सन (पी२पी) व्यवहार अजूनही पुढे आहेत. या व्यवहारांची एकूण किंमत मर्चंट पेमेंट्सपेक्षा दुप्पटपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, सुमारे ४४ टक्के पी२पी व्यवहार ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आहेत. एकूणच, यूपीआयमुळे डिजिटल व्यवहार अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहेत. मोबाईलच्या मदतीने काही सेकंदांत पैसे पाठवणे आणि स्वीकारणे शक्य झाल्यामुळे लोकांचा कल रोख व्यवहारांपासून डिजिटल पेमेंटकडे वळला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यूपीआय आणखी मोठे विक्रम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.