Bandhu Teaser : उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदाच आले एकत्र; ‘बंधू’चा भावस्पर्शी टीझर रिलीज
Bandhu Teaser : ‘बंधू’चा टीझर पाहता हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे दिसते.

Bandhu Teaser : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून दोन भावांमधील भावनिक बंध दाखवण्यात आला आहे.
‘बंधू’ या चित्रपटातून मराठी मनोरंजनविश्वातील दोन दमदार कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या जोडीची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. दोघांचाही चाहतावर्ग मोठा असल्याने त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येण्याची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा आहे.
‘बंधू’चा टीझर पाहता हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे दिसते. दोन भावांचे नाते, त्यांच्यातील जिव्हाळा आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची भावना या कथेतून उलगडणार आहे.
‘काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती आयुष्यभर एकमेकांसाठी उभं राहण्यातून घट्ट होतात…’ या भावनिक कॅप्शनसह चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘बंधू’मधून प्रेक्षकांना नातेसंबंधांची हळवी आणि मनाला भिडणारी कहाणी अनुभवायला मिळणार आहे.
या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत मृण्मयी देशपांडे, मिताली जगताप, स्मिता तांबे, रेणुका दफ्तरदार, श्रीकांत यादव, यशपाल सारनाथ, ज्ञानरत्न अहिवाळे, चैतन्य सोलनकर, श्रीपाद पानसे, शौर्य अनिल पाटील आणि विठ्ठल काळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. आता हे दोघे ‘बंधू’च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
२० नोव्हेंबरला चित्रपटगृहात होणार दाखल
‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भावनिक कथा, ग्रामीण पार्श्वभूमी आणि दोन ताकदीच्या कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाकडे आकर्षित करणारी गोष्ट आहे. आता टीझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आणि पडद्यावर ही भावंडांची गोष्ट कशी उलगडणार, याची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे.





