UP Election : अमित शहांचं चॅलेंज अखिलेश यांनी स्वीकारलं; म्हणाले, जागा अन् वेळ सांगा…

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील निवडणुकीला आता चांगलाच जोर चढला आहे. भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असलेले अमित शहा देखील मैदानात उतरले आहेत. त्यातच अमित शहा आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात वाकयुद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. अमित शाह यांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्दावर अखिलेश यादव यांना खुल्या चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. त्याला लागलीच अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं असून वेळ आणि ठिकाण सांगा असं आव्हान दिलं आहे.
शहा म्हणाले होते की, अखिलेश बाबूंना लाजही वाटत नाही. कायदा सुव्यवस्था ठीक नसल्याचे ते आरोप करतातय. आज मी सार्वजनिक कार्यक्रमात आकडेवारी घेऊन आलोय. हिंमत असेल तर त्यांनी आकडे घेऊन पत्रकार परिषदेला यावं.
हम हर चैलेंज के लिए अभी तैयार हैं… सच को तैयारी की ज़रूरत नहीं पड़ती… वो जगह बताएं, समय बताएं!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 30, 2022
त्यावर अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटलं की, आम्ही प्रत्येक चॅलेंजला आता तयार आहोत. खऱ्याला तयारीची गरज भासत नाही. तुम्ही केवळ जागा अन् वेळ सांगा.





