UP Election 2022: बेरोजगारी, महागाईवरून लक्ष हटवण्यासाठीच हिजाबचा मुद्दा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी यांची भाजपवर टीका
नवी दिल्ली – बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच भाजपकडून निवडणुकीमध्ये हिजाबचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे, अशी टीका कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे.
सध्या लोकांच्या समोर उपासमार हा खरा प्रश्न आहे. बेरोजगारांना नोकरी मिळेल की नाही? लोक जिवंत तरी राहतील की नाही? हे खरे प्रश्न आहेत. मात्र, या मुद्द्यांवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप हिजाबचा मुद्दा उपस्थित करत आहे, अशी टीका येचुरी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केली.
लोकांच्या समोरील खऱ्या प्रश्नांची उत्तरे भाजपकडे नाहीत. लोकांनी जिवंत राहावे यासाठी भाजप काय करत आहे, हे देखील ते सांगू शकत नाहीत. हे सर्वसामान्य माणूस मान्य करायला तयार नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे, असे येचुरी म्हणाले.
जर भाजप सत्तेत आली नाही, तर उत्तर प्रदेशची स्थिती पश्चिम बंगाल, केरळ किंवा जम्मू-काश्मीरसारखी होईल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. येचुरी यांनी त्यावरही टीका केली.
उत्तर प्रदेशची तुलना केरळबरोबर करणे म्हणजे विनोद आहे.निती आयोगानुसार केरळ अव्वल क्रमांकावरील राज्य आहे. मानव विकासाच्या निर्देशांकांत केरळ सर्वोत्तम राज्य आहे, असेही येचुरी म्हणाले.




