दि.3 मेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश

पुणे – देशात लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू असलेली जमावबंदीचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये व करोना विषाणू (कोव्हीड-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करोना विषाणू साथ संसर्ग अनुषंगाने विविध आदेश पारीत करण्यात आले होते.
तथापि, लॉकडाऊन बाबत राज्यात सुधारित घोषणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोरा राम यांनी प्राप्त अधिकारानुसार पुणे जिल्ह्यामध्ये यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे. या आदेशाचे व्यक्तींनी/ नागरिकांनी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली
जाणार आहे.





