Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही
Covid-19 आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्या आढळणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. सर्दी, घसा खवखवणे, हलका ताप, खोकला, अंगदुखी किंवा डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे आढळत आहेत. बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती, पुरेसे पाणी आणि आवश्यक औषधांमुळे बरे होत आहेत.

Covid-19: कोरोना महामारीचे नाव ऐकताच 2020 ते 2023 या काळातील भीषण आठवणी अनेकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आता पुन्हा एकदा देशात कोरोनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. जुलै महिन्यात भारतात काही नवीन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांनी सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, 1 ते 16 जुलै 2026 या कालावधीत देशभरात 339 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 115 रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये 64, महाराष्ट्रात 43, तामिळनाडूमध्ये 39, दिल्ली आणि अंदमान-निकोबारमध्ये प्रत्येकी 18, तर राजस्थानमध्ये 12 रुग्ण आढळले आहेत. इतर काही राज्यांमध्येही किरकोळ प्रमाणात संसर्गाची नोंद झाली आहे.
यापूर्वी जून महिन्यात आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात कोरोनाचे काही रुग्ण आढळल्यानंतर संसर्ग पुन्हा वाढत असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः आंध्र प्रदेशातील परिस्थितीने आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. (Covid-19)
आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जून ते 16 जुलै या काळात राज्यात 12 कोरोना रुग्ण आढळले. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती आणि कोरोनाचा संसर्ग त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरला.
या चार मृत्यूंपैकी तीन रुग्ण कडप्पा जिल्ह्यातील, तर एक रुग्ण काकीनाडा जिल्ह्यातील होता. राज्यातील यंदाचा पहिला कोरोना रुग्ण 26 जून रोजी कडप्पा येथे आढळला होता. त्यानंतर 1 ते 16 जुलैदरम्यान आणखी 11 नवीन रुग्णांची नोंद झाली. (Covid-19)

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, काही रुग्णांना संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून संसर्ग झाला. 26 जून ते 15 जुलै या कालावधीत राज्यात 67 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर बारावा रुग्ण तामिळनाडूमधील वेल्लोर येथे तपासणीदरम्यान संक्रमित असल्याचे समोर आले.
सध्या तीन रुग्ण घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दोन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, तीन जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, हे रुग्ण एकाच भागातील किंवा एकाच समूहातील नसून वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहेत. त्यामुळे सध्या तरी हा संसर्ग क्लस्टरच्या स्वरूपात पसरत असल्याचे संकेत नाहीत. (Covid-19)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्या आढळणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. सर्दी, घसा खवखवणे, हलका ताप, खोकला, अंगदुखी किंवा डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे आढळत आहेत. बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती, पुरेसे पाणी आणि आवश्यक औषधांमुळे बरे होत आहेत. (Covid-19)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना आता एन्डेमिक स्वरूपात आहे. म्हणजेच हा संसर्ग पूर्णपणे संपलेला नसला तरी तो पूर्वीइतका धोकादायक राहिलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, ताप, खोकला किंवा श्वसनासंबंधी त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच हातांची स्वच्छता, आवश्यकतेनुसार मास्कचा वापर आणि गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे ही सवय कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.





