Pune News : नाहक त्रास…! भुयारी मार्गात गाळ साचल्याने वाहतूक ठप्प; बिबवेवाडी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune News : पुणे शहरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. तसेच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुण्यातील बिबवेवाडी येथील नारायणदासजी दुगड या भुयारी मार्गाची देखील अशीच अवस्था पाहायला मिळाली.
7 ते 8 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गाचे बांधकाम हे योग्य पद्धतीने झाले नसून, भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूने तीव्र उतार आहे. परिणामी पावसाचे वाहून येणारे पाणी या भुयारी मार्गाच्या मध्यभागी साठते. पावसाच्या पाण्यासोबतच कचरा व राडारोडा देखील मोठ्या प्रमाणात वाहून येतो.
वाहून येणाऱ्या जाण्यासाठी इथे एकमेव चेंबर असल्याचे पाहायला मिळते. परिणामी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा गाळ या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात साचतो. मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे आज हा भुयारी मार्ग रात्रीपासून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बिबवेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गाळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता गेल्या चार तासांपासून म्हणजेच सकाळी साडेसहा वाजल्यापासून आम्ही हा गाळ काढण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या भुयारी मार्गाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाले असून, भुयारी मार्गाच्या आजूबाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील पाणी देखील इथे सोडण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





