अनोळखी व्हिडिओ कॉल घेणे येतेय अंगलट

व्हिडिओ मॉर्फ करून ब्लॅकमेलचा फंडा, कराडच्या युवकाला आला अनुभव
कराड – संभाषणाचे साधन म्हणून पूर्वी मोबाईलकडे पाहिले जात होते. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा मोबाईल मध्येही झपाट्याने बदल होत गेला. त्यातच मोबाईलला इंटरनेटची मात्रा मिळाल्याने सोशल मीडियाचा जन्म झाला.
प्रगतीचा आलेख चढता असतानाच याचे दुष्परिणाम ही गेल्या काही वर्षापासून समोर आले आहेत. आता तर चक्क व्हिडिओ कॉलचा वापर करून समोरच्याला ब्लॅकमेल करण्याचा फंडा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. असाच एक प्रकार कराडधील युवकाबाबत नुकताच घडला.
दोन दिवसापूर्वी कराड मधील एका युवकाला अनोळखी नंबर वरून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉल आला. त्या युवकाने तो कॉल उचलला, मात्र हा अनोळखी कॉल असल्याचे लक्षात येताच तो कॉल कट केला, मात्र या दहा सेकंदाच्या कालावधीत समोरील व्यक्तीने डाव साधला. त्याने व्हिडिओ कॉल मधील युवकाचा फोटो घेऊन तो मॉर्फ केला. त्यानंतर काही मिनिटातच त्या युवकाच्या मोबाईलवर मॉर्फ केलेला फोटो जोडून बनवलेली अश्लील चित्रफीत पाठवली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो युवकही हबकला. तुमची अश्लील चित्रफिट माझ्याकडे आहे आणि ती मी फेसबुक व इंस्टाग्राम वर अपलोड करणार आहे, अपलोड करायची नसेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी धमकी समोर व्यक्तीकडून त्या युवकांना देण्यात आली. त्या युवकाने या गोष्टीकडे लक्ष न देता मोबाईल स्विच ऑफ केला.
दुसऱ्या दिवशी मै दिल्ली सायबर क्राईम से बोल रहा हु, आपकी अश्लील फिल्म हमारे पास है. असे म्हणत समोरील व्यक्तीने उलट युवकावरच गुन्हा दाखल झाला असल्याचे रेटून सांगितले. सुरू असलेल्या या प्रकारामुळे अखेर त्या युवकाने पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे त्या युवकाची आर्थिक लूट थांबली.
मात्र समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या या ना त्या कारणास्तव अशा घटनांना बळी पडत आहेत. मोबाईल जेवढा चांगला, तेवढे त्याचे दुष्परिणाम ही. सुरुवातीला मोबाईल फोन उचलन्याचेही पैसे पडत होते. आता मात्र पूर्ण चित्र बदलले आहे. मागील काही वर्षात मोबाईलची वाटचाल अँड्रॉइड मोबाईलकडे झाली. त्यात टू जी, थ्री जी, फोर जी सारख्या फास्ट सेवा देणाऱ्या इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर सर्व काही एका क्लिक मध्ये तेही मोबाईलमध्ये सहज उपवब्ध होउ लागले.
व्हाट्सअप, इंटरनेट, यू ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा प्रकारच्या ऍपची लोकांना सवय लागली. या साईटवर आपले खाजगी जीवनाचे फोटो देखील अपलोड होऊ लागले. बऱ्याच वेळा याचाही फटका काहीजणांना बसला असून त्यांनाही ब्लॅकमेल करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. यातुन होणारा मानसिक त्रास वेगळाच. गेल्या काही दिवसांपासुन व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा फंडा जोर धरू लागला आहे. त्यामुळे असे कॉल उचलले टाळणे केव्हाही चांगले.
हा सायबर गुन्हा
सायबर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटशी संबंधित असणाऱ्या व संगणकाचा प्रामुख्याने वापर झालेल्या गुन्ह्यासाठी वापरली जाते. हॅकिंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी सायबर गुन्हे आहेत. याशिवाय खासगी व गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. गेल्या काही वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
समोरील व्यक्ती सावज हेरून लोकांना व्हीडिओ कॉल करून संपर्क साधण्याचा करण्याचा प्रयत्न करत असतात. समोरून मोहाच्या गोष्टी केल्या जातात आणि नंतर इमोशनल ब्लॅकमेल करून पैशाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी असे अनोळखी व्हिडिओ व ऑडिओ कॉल निदर्शनास येताच पुढील संभाषण न करता ते फोन तात्काळ कट करावेत. तसेच शक्यतो सोशल मीडियावर आपल्या खाजगी जीवनातील काही फोटो ठेवू नयेत. त्यांचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते, यातूनही ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार घडत आहेत.
– बी. आर. पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर





