इस्रायलकडून गाझा ताब्यात घेण्यबद्दल सार्वत्रिक चिंता

जेरुसलेम – इस्रायलकडून गाझा सिटी ताब्यात घेतली जाण्याबद्दल पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे. इस्रायलने सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. तर लक्षावधी लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. आता गाझा सिटी ताब्यात घेण्यासाठी नव्याने आक्रमण केल्यास पॅलेस्टिनींचे भवितव्य काय असेल, याबद्दल तीव्र चिंता व्यक्त होते आहे.
इस्रायलने गाझा ताब्यात घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक रविवारी बोलावण्यात आली आहे. या महिन्यात या परिषदेचे अध्यक्षपद पनामाकडे आहे. ही बैठक शनिवारी ठरली होती. मात्र शनिवार हा ज्यूंचा प्रार्थनेचा दिवस आहे. सुरक्षा परिषदेमध्ये इस्रायलला मत मांडता यावे, म्हणून बैठक रविवारी निश्चित केली गेली.
हमासच्या ताब्यातून इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न सुरू असून इजिप्त आणि कतारने त्यासाठी एक आराखडा करायला घेतला आहे. ओलिसांची सुटका आणि गाझामधून इस्रायलच्या संपूर्ण सैन्याने माघार घेण्याच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचे दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आता या मध्यस्थीच्या प्रयत्नांना किती यश येईल, याबद्दल साशंकता आहे.
दुसरीकडे इस्रायलने गाझाचा पुर्ण ताबा घेण्याचा निर्णय हमासने फेटाळून लावला असून तसे झाल्यास पॅलेस्टिनी उद्यानामध्ये फिरणार नाहीत, अशी गर्भित धमकीही हमासने दिली आहे. गाझातील पॅलेस्टिनी भुकेने व्याकूळ झाले असताना इस्रायलने युद्धाची व्याप्ती वाढवण्यावर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि कॅनडानेही टीका केली आहे.
त्यावर हा ताबा केवळ गाझामध्ये हंगामी शासन व्यवस्था स्थापन करेपर्यंत असणार आहे. गाझावर इस्रायलचे कायमस्वरुपी नियंत्रण असणार नाही. हमासने ओलिसांची सुटका करावी, यासाठी हमावर दबाव आणण्यासाठीच पुर्ण क्षेत्राचा ताबा घेणे आवश्यक असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.





