काबूल – अफगाणिस्तानमधील आरोग्य यंत्रणेसाठी संयुक्त राष्ट्राकडून 4 कोटी 50 लाख डॉलरची आपत्कालिन मदत जाहीर केली आहे. अफगाणिस्तानमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्यापासून वाचवण्यासाठी ही आपत्कालिन मदत देण्यात येणार आहे, असे संयुक्त राष्ट्राचे मदत विभागाच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये औषधे, वैद्यकीय साहित्य आणि इंधन संपत आहे. शीतगृहांद्वारे करण्यात येणारा पुरवठा संपत चालला आहे. अत्यावश्यक आरग्य सेवा कर्मचाऱ्यांना मानधनही दिले जात नाही आहे, याकडे संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवतावादी व्यवहार विभागाचे कनिष्ठ सरचिटणीस आणि आपत्कालीन मदत समन्वयक मार्टिन ग्रिफिथ्स यांनी लक्ष वेधले.
गेल्या महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेचे नियंत्रण घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील आरोग्य यंत्रणा संकटात सापडली आहे. आरोग्य सुविधा तेथे पोहोचवल्या जाऊ शकत नाही आहेत.
अनेक आरोग्य यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही गंभीर आपत्ती येऊ नये म्हणून अफगाणिस्तानमधील आरग्य यंत्रणेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रीय आपत्कालीन प्रतिसाद निधीतून हा निधी दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.