3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवू; केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आश्वासन

वसई : राज्यात आमचे सरकार आलं तर 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवू, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. वसई पश्चिमेतील दिवानमाण येथील कल्पतरू मैदानावर त्यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकारची गरज अधोरेखित केली आणि विरोधकांवर जोरदार टीका देखील केली.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत आज जागतिक श्रीमंतीत टॉप 5 मध्ये असून, 2027 पर्यंत टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल. 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रतिमहिना 1500 मिळणार आहे, हे रक्कम सुरक्षित राहील. तर आयुष्यमान भारत योजनेनुसार 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार होत आहे.
तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं वाढवण बंदराची उभारणी या सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.





