नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळच्या सुमारास दोन वेळा फोन करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात दाखल झाले आहेत.
वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिलाय. नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोर नितीन गडकरींचे हे जनसंपर्क कार्यालय आहे. गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. नितीन गडकरींना धमकीचे फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे.
यापूर्वी 14 जानेवारी रोजी गडकरींना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. धक्कादायक म्हणजे मागच्या वेळी ज्या गुंडाच्या नावाने धमकी देण्यात आली होती, त्याच गुंडाच्या नावाने आज सकाळी पुन्हा एकदा दोन वेळा कॉल आले. जयेश पुजारी असे या गुंडाचे नाव आहे. या कुख्यात गुंडावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूलीचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण
यापूर्वी तो कर्नाटकातील कारागृह तोडून फरार देखील झाला होता. पुन्हा एकदा त्याच गुंडाच्या नावाने आज दोन वेळा धमकीचे फोन आल्याने पोलीस यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळाल आहे. या गुंडाला जयेश कांता नावाने देखील ओळखले जाते.
गेल्या वेळी आलेली धमकी ही चक्क कर्नाटक येथील कारागृहातून करण्यात देण्यात आली होती. त्यावेळी त्या कैद्याकडे फोन आला कसा असा प्रश्न पडला होता. परंतू आता पुन्हा गडकरींना धमकीचे फोन आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.