Nitin Gadkari : नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “आता जास्त काम करू शकत नाही”, राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी काटोलमधील कार्यक्रमात ‘आता जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे’ असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदलाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग’ कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी नवीन पिढीला काम करण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली.
नितीन गडकरी म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात सतत काम करत आहे. अनेक चढउतार पाहिले, अनेक पुरस्कारही मिळाले. पण आता मी जास्त काम करू शकत नाही. नवीन पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे गडकरी यांच्या राजकीय निवृत्तीबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
गडकरी हे २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. देशभरात एक्स्प्रेसवे आणि महामार्गांच्या कामांमुळे ते विशेष चर्चेत राहिले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. गडकरी सातत्याने इथेनॉलच्या वापराचे समर्थन करत असून, यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा काही ग्राहकांकडून केला जात आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून गडकरींना लक्ष्य केले आहे.
‘सत्ता आणि पद काही कामाचे नाही’ –
आपल्या दिनचर्येतील बदलांविषयी बोलताना गडकरी म्हणाले की, पूर्वी पक्षाचे काम करताना समोसे खाऊन कुठेही झोपत होतो. मात्र, कोरोनानंतर त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारली असून दररोज नियमितपणे योगा करतात. “तब्येतच चांगली नसेल तर सत्ता आणि पद काही कामाचे नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या उर्वरित काळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठे काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत आता चर्चांना वेग आला आहे.





