केंद्रीयमंत्री गडकरींची आ. आशुतोष काळेंनी घेतली भेट

कोपरगाव – आ. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून नुकतीच केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. कोपरगाव मतदारसंघातील झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (राज्य मार्ग ६५) ची दर्जोन्नती करुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरू असतात. त्या उत्सवावेळी एन.एच.७५२ जी वरून शिर्डीकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाटामार्गे याच झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असल्यामुळे या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता खराब होत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.
झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याच्या लगतच एन.एच.१६० व समृद्धी महामार्ग असून त्या मार्गाची समस्या कायमची मिटली आहे. परंतु राज्य मार्ग ६५ वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे या मार्गाचे मजबुतीकरण व रुंदीकरण होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली. सध्या सुरू असलेल्या एन.एच.७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते येवला नाका मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावर सूचना कराव्यात, अशी विनंती आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.





