अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराची संथ सुरुवात, ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्य नागरिक डोळे लावू लावून बसले आहेत. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शनिवार असतानाही आज भारतीय शेअर बाजार सुरू राहणार आहे. अर्थसंकल्पनिमित्ताने विशेष ट्रेडिंग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची संथ सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स आज सकाळी 137.23 अंकांनी वाढून 77637 अंकांवर व्यवहार करत होता. तर एनएसई इंडेक्स निफ्टी50 अवघ्या 20.20 अंक किंवा 0.08 टक्क्यांनी वधारून 23,528 अंकांवर उघडला आहे. सकाळी 9.30 वाजता बीएसई सेन्सेक्स 280 अंकांनी वाढून 77,770 अंकांवर व्यवहार करत होता.
त्याआधी 31 जानेवारी 2025 रोजी सेन्सेक्स 741 अंकांनी वाढून 77501 च्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी सुमारे 259 अंकांनी वाढून 23508 च्या पातळीवर बंद झाला. मात्र, अर्थसंकल्पाच्याआधीच्या एका महिन्यात निफ्टीमध्ये 0.58 टक्क्यांनी आणि सेन्सेक्स सुमारे 0.80 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होण्याआधी बाजारात स्थिर सुरुवात पाहायला मिळाली आहे. आज सकाळी रिअल्टी, हेल्थकेअर आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर, FMCG, ऑइल अँड गॅस आणि PSU बँक शेअर्समध्ये घसरण झाली.
निफ्टीवर Sun Pharma, BEL, ITC Hotels, M&M आणि Ultratech Cement या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसली. तर, ONGC, Hero Motocorp, Dr. Reddy, Nestle India आणि Titan यामध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.
गेल्या 10 वर्षांत एकूण 14 वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यातील 8 वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार घसरण पाहायला मिळाली, तर 6 वेळा शेअर बाजारात तेजी राहिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणेनंतर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.





