MSME क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा, आता मिळणार 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष ‘ग्यान’वर आहे. GYAN म्हणजे G – गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N – नारी शक्ती.
अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरेंटी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय, क्रेडिट गॅरेंटी अंतर्गत उद्योगांना मिळणाऱ्या कर्जात वाढ करण्यात आली आहे.
सरकार सुक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मर्यादा असलेले कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड सादर करणार आहे. क्रेडिट गॅरेंटी अंतर्गत एमएसएमई उद्योगांना मिळणाऱ्या कर्जातही वाढ करण्यात आली आहे.
आता क्रेडिट गॅरेंटी अंतर्गत एमएसएमई उद्योगांना मिळणारे कर्ज 5 कोटींवरून 10 कोटी रुपये करण्यात आले आहे. स्टार्टअप्ससाठी कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपये आणि चांगल्या प्रस्थापित निर्यातदार MSME साठी टर्म लोन 20 कोटींपर्यंत असेल. या क्षेत्रासाठी पुढील पाच वर्षांत 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.
देशात 5.7 कोटी लघुउद्योग आहेत. त्याद्वारे 7.5 कोटी रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे आता एमएसएमई उद्योगांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. यूरिया, डाळी आणि खाद्यतेलांच्याबाबतीत आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य दखील सरकारने समोर ठेवले आहे.





