Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांपासून ते MSME आणि स्टार्टअप्ससह मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठीही विशेष घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून लिथियम-आयन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात करण्यात आलेल्या घोषणेचा इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांना फायदा होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात कोबाल्ट, लिथियम-आयन बॅटरी स्क्रॅप, शिसे, झिंक आणि इतर 12 महत्त्वाच्या खनिजांवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) हटवण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे मटेरियल बॅटरी, सेमीकंडक्टर आणि नवीकरणीय ऊर्जा उपकरणांच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असते. मात्र, आता यावरील कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आली असल्याने या खनिजांवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या उत्पादन खर्चात घट होणार आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेली लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठीच्या 35 अतिरिक्त वस्तूंना सीमा शुल्कातून सवलत दिली जाणार आहे. याचा थेट फायदा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही होईल. यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. ईव्ही बॅटरी उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या 35 इतर मटेरियल्स आणि मोबाइल फोन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठीच्या 28 वस्तूंना करमुक्त करण्यात आले आहे. यामुळे कंपन्यांना अतिरिक्त कर न देता बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी आवश्यक मशीन्स आणि उपकरणं आयात करता येतील. यामुळे आता स्थानिक बाजारपेठीत बॅटरी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल व आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. अर्थसंकल्पात नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनचीही घोषणा करण्यात आली असून, याचा फायदा ऑटो क्षेत्राला होणार आहे.