Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना केली जाणार आहे. तसेच, नवीन विमानतळ देखील उभारले जाणार आहे. यंदा अर्थमंत्र्यांनी नेसलेली साडी ही बिहारशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. ही साडी पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी त्यांना भेट दिली होती. त्यातच आता अर्थसंकल्पातही बिहारसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याच्या माध्यमातून मखाना उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, मखानाच्या उत्पादन आणि संवर्धनाला चालना मिळेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. बिहारमध्ये नवीन ग्रीनफिल्ड विमानतळही उभारले जाणार आहे. पटना आणि बिहटा विमानतळांव्यतिरिक्त आणखी नवीन विमानतळ उभारले जाईल. पटना आयआयटीची विद्यार्थी क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार आहे. याशिवाय, एक एआयटीचीही स्थापना केली जाणार आहे. याशिवाय, बिहारच्या सीमांचल भागासाठी कोसी कालव्याची घोषणा करण्यात आली. या कालव्याच्या माध्यमातून 50 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मिथिलांचलमध्ये पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाईल व यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, बिहारमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.