बेरोजगारीचा दर अडीच वर्षांच्या उच्चांकांवर

नवी दिल्ली – केंद्र सरकार देशातील रोजगार राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा पुनःपुन्हा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात रोजगारनिर्मिती कमी झाल्याची माहिती सीएमआयई या संस्थेच्या अभ्यास अहवालातून पुढे आली आहे.
एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांतील बेरोजगारीचा दर 8.1 टक्क्यावर गेला आहे. हा अडिज वर्षातील उच्चांक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील बेरोजगारीचा दर 7.9 टक्के, दुसऱ्या आठवड्यातील बेरोजगारीचा दर 8.1 टक्के तर तिसऱ्या आठवड्यातील बेरोजगारीचा दर 8.4 टक्के इतका होता. या तीन आठवड्यांतील सर्वसाधारण बेरोजगारीचा दर 8.1 टक्के इतका होता. हा अडीच वर्षातील बेरोजगारीचा उच्चांक असल्याचे सीएमआयई या संस्थेने या संबंधात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मार्च महिन्यातील सर्वसाधारण बेरोजगारीचा दर 6.7 टक्के होता. आता एप्रिलचा बेरोजगारीचा दर त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर सध्या 7.6 टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.5 टक्के असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.




