Pune News : हॉस्टेल, पीजी चालकांना पोलिसांची नोटीस; २४ तासांत माहिती देण्याचे आदेश
Pune News : पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Pune News : पुणे शहरातील हॉस्टेल, पेइंग गेस्ट (पीजी) सेंटर आणि भाडेकरूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांनी पेठेतील पीजी सेंटर चालकांना नोटीस बजावली आहे. (Pune News)
नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत हॉस्टेल व पीजी सेंटरसंबंधी आवश्यक कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Pune News)
पुणे शहरासह देशातील विविध ठिकाणी यापूर्वी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले झाले आहेत. अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती किंवा त्यांना माहिती पुरविणारे गुप्तहेर आणि सराईत गुन्हेगार हॉस्टेल अथवा भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Pune News)
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हॉस्टेल आणि पीजी सेंटरमधील रहिवाशांची माहिती संकलित करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या नावाने ९ ऑक्टोबर रोजी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. (Pune News)
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गत बजावलेल्या या नोटिशीत पीजी सेंटरचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह संबंधित विभागांकडून घेतलेल्या परवानग्यांच्या छायांकित प्रती सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जागामालक आणि भाडेकरू यांच्यात झालेल्या भाडेकराराची प्रतही जमा करावी लागणार आहे. (Pune News)
विद्यार्थ्यांची माहिती आणि पडताळणी आवश्यक
हॉस्टेल व पीजीमध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन टेनंट व्हेरिफिकेशन करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधारकार्डाची प्रत, संबंधित विद्यार्थी ज्या लायब्ररी किंवा अकॅडमीमध्ये जात असेल तेथील ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक यांची यादी पोलिसांकडे सादर करावी लागणार आहे. (Pune News)
तसेच पीजी सेंटर चालविण्यासाठी संबंधित सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्रही जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थी किंवा रहिवासी एखाद्या संस्थेशी अथवा आस्थापनेशी संबंधित असल्यास त्यांचे ओळखपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि सध्याचा मोबाइल क्रमांक घेऊन त्याची खातरजमा करावी. यासाठी स्वतंत्र नोंदवही अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Pune News)
सीसीटीव्ही फुटेज ६० दिवस जतन करा
सुरक्षेच्या दृष्टीने हॉस्टेल आणि पीजी सेंटरच्या योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज किमान ६० दिवस जतन राहील, याची दक्षता घेण्यास पोलिसांनी सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून किंवा भाडेकरूंकडून मिळणारे भाडे पूर्णतः किंवा अंशतः ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Pune News)
नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत सर्व आवश्यक माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात जमा करणे अपेक्षित आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Pune News)





