Pune News : लोहगाव पोलीस ठाण्यात मारहाणीत तरुणाचा मृत्यू; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
Pune News : पुणे शहरातील लोहगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pune News : लोहगाव पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आकाश देवदास घलोत (वय तपशील उपलब्ध नाही) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला ५ ऑक्टोबर रोजी लोहगाव पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. (Pune News)
तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी काठी, बेल्ट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप आकाश याने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांकडे केल्याचे त्याच्या आईने पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Pune News)
आकाश याची प्रकृती ८ ऑक्टोबर रोजी अचानक बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी त्याने आई आणि बहिणीला पोलीस ठाण्यात झालेल्या कथित मारहाणीची माहिती दिली. (Pune News)
संबंधित घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्यामुळे आपण यापूर्वी कोणालाही काही सांगितले नव्हते, असेही त्याने कुटुंबीयांना सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्याच दिवशी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला. (Pune News)
या मृत्यूमागील नेमके कारण आणि कथित मारहाणीची वस्तुस्थिती तपासून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आकाशची आई गीता घलोत यांनी ९ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. (Pune News)
सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची मागणी
या प्रकरणाचा तपास लोहगाव पोलीस ठाण्याशी संबंधित नसलेल्या स्वतंत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत करावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. ५ ऑक्टोबर रोजीचे पोलीस ठाण्यातील तसेच प्रवेशद्वार आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी, ड्युटी रजिस्टर, उपस्थिती नोंदी आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित ठेवावेत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Pune News)
ससून रुग्णालयातील उपचारांच्या नोंदी, वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवालाची निष्पक्ष पडताळणी करावी. आकाशने मृत्यूपूर्वी आई व बहिणीला सांगितलेल्या घटनेची नोंद घेऊन अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. कुटुंबीय आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव आणला जाऊ नये, यासाठी संरक्षणात्मक उपाय करण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली आहे. (Pune News)
न्याय मिळेपर्यंत अंत्यविधी रोखण्याचा इशारा
आकाशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा आणि कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास अटकेची कारवाई करावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. (Pune News)
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास अंत्यविधी पुढे ढकलून न्याय मिळेपर्यंत निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा तक्रारदाराने दिला आहे. तसेच लोहगाव पोलीस ठाण्यासमोर शांततापूर्ण निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Pune News)

