Undri fire accident : भीषण सिलेंडर स्फोटात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ; अग्निशमन जवानही जखमी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – उंड्री येथे गुरुवारी जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल स्पॅसिओ सोसायटीच्या चौदा मजली इमारतीत भीषण आग लागली. दुपारी झालेल्या सिलेंडर स्फोटात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह पाच जखमी झाले. आग सदनिकेतील बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक एफ-१२०१ मध्ये लागली होती.
तर्ष कमल खेेतान (१५) असे मृताचे नाव असून जखमींमध्ये डॉ.मृणाल मयंक (४२), योगेश गिरीधर जाधव( ४२), जीशान साहील खान(३५), विनोन मोहन लिमकर (३२,सुरक्षा रक्षक) यांचा समावेश आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने पाच अग्निशमन वाहने, एक बी.ए. सेट व्हॅन, दोन टँकर आणि एक उंच शिडीचे वाहन घटनास्थळी रवाना केले. जवानांनी आग विझवण्यासाठी तातडीने होज पाइपवर आग विझवण्याचे काम सुरू केले. दरम्यान, सदनिकेत अडकलेल्या १५ वर्षीय तर्ष कमल खेतान याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असताना स्वयंपाकघरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तीन स्थानिक नागरिक आणि दोन अग्निशमन जवान गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने गेट वेल सून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. दुर्दैवाने, या आगीत तर्ष खेतान याचा जागीच मृत्यू झाला. आगीत संपूर्ण सदनिका जळून खाक झाली. प्राथमिक चौकशीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे; मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, या इमारतीतील स्थायी अग्निशमन यंत्रणा प्राथमिक स्तरावर बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी चौकशी सुरू केली आहे.
यामुळे जवानांना बाराव्या मजल्यापर्यंत पाईप घेऊन जावे लागले. जवान आणि नागरिक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच दरवाजापाशीच सिलेंडरचा स्फोट झाला. या सदनिकेत प्रवेशव्दाराच्या खोलीतच किचन आहे. यामुळे जवान आणि बचाव कार्य करणारे नागरिकही जखमी झाले. आतील मुलगा वाचू शकला नाही.काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील म्हमाले की, घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तातडीने हजर झाले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणाखाली होती. जखमींमध्ये सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश होता.





