Underworld Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ? ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Underworld Don Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विषप्रयोगानंतर त्याची अवस्था अंत्यत गंभीर झाल्यामुळे त्याला पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ह वृत्त दिले आहे. मात्र विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी अजूनही करण्यात आली नाही.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर दाऊदवरच उपचार सुरु आहेत. फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच त्याठिकाणी प्रवेश देण्यात येत आहे.
दरम्यान, या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती . सोशल मीडियाद्वारे कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलीस अथवा गुन्हे शाखेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच पाकिस्तानी माध्यमांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही. पण पाकिस्तानी सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा आहेत.
अंडरवर्ल्ड डॉनला रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तानंतर मुंबई पोलीस दाऊदचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने जानेवारीमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितलं होतं की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसऱ्यांदा लग्न केल्यापासून तो कराचीमध्येच राहत आहे.





