MD Seized : मुंबई डीआरआयची मोठी कारवाई ! दाऊद टोळीशी संबंधीत कारखान्यातून 92 कोटींचा एमडी जप्त

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) भोपाळमधील हुजूर तालुक्यातील जगदीशपूर भागात चालणाऱ्या कारखान्यातून ६१ किलो २०० ग्रॅम मेफेड्रोन (द्रव स्वरूपात) जप्त करण्यात आला. काळ्या बाजारात त्याची किंमत ९२ कोटी रुपये आहे. या कारखान्यामागिल सूत्रधार सलिम डोला असून त्याचे कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले.
या कारखान्यासाठी सूरत व मुंबईतून हवाला मार्फत पैसे जात होते. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने ऑपरेशन क्रिस्टल ब्रेक नावाने विशेष मोहिम राबवून भोपाळ मेफेड्रोन (एमडी) केली. या कारवाईत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनूसार, १६ ऑगस्टला भोपाळ जिल्ह्यातील हुजूरमधील जावदिशपूर (इस्लामनगर) येथे कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६१ किलो २०० ग्रॅम द्रव स्वरूपातील एमडी जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ९२ कोटी रुपये आहे. याशिवाय या कारवाईत ५४१ किलो ५३० ग्रॅम कच्चा माल जप्त करण्यात आला.
यात मिथिलीन डायक्लोराईड, ऑसिटोन, मोनोमिथाईल अमाईन, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि 2-ब्रोमो यांच्या समावेश आहे. याशिवाय एमडी निर्मितीसाठी लागणारी उपकरणेही डीआरआयने जप्त केली आहेत. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी कारखाना चारही बाजूंनी झाकून ठेवण्यात आला होता.





