साद-पडसाद: शिक्षणाचे प्रारूप समजून घेताना…

देवयानी देशपांडे

अर्थार्जनासाठी कामाचे क्षेत्र निवडताना प्रत्येकाची वैचारिक बैठक तयार असणे हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. शालेय शिक्षणाच्या टप्प्यात ही बैठक घडवण्याचे व्रत हाती घेणारे, समाजाचे भान देणारे शिक्षक ही आजची निकड आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या सन 2018-19च्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये देशभरातील शाळांमधील एकूण 34 शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले. पैकी, 12 शिक्षक हे दिल्लीच्या शाळांमधील आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची दहशत निवळावी आणि विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना अनेक नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची दखल पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. या अनुषंगाने काही मुद्दे विचारार्थ पुढे येतात.

खरेतर, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, रोजगार संधींचा तुटवडा, भारतातील लोकसंख्या लाभांश असलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्यात आलेले अपयश आणि सन 2037 पर्यंत भारतामध्ये असणारी तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या या पार्श्‍वभूमीवर “शिक्षकांची भूमिका’ आणि त्या अनुषंगाने पुढे येणारे वास्तव यावर चिंतन, मनन होणे ही सध्याची गरज आहे. शिक्षणाचे नेमके “भारतीय प्रारूप’ या निमित्ताने आपल्या विचारांतून साकारेल अशी आशा बाळगूयात.
रोजगार संधी आणि शिक्षण साऱ्याच शाळा आणि महाविद्यालये शर्यतीत आहेत असे भासते. अधिकाधिक विद्यार्थी अभियंता किंवा वैद्यक कसे होतील, त्यांना आयत्या रोजगार संधी कशा उपलब्ध होतील याकडे शिक्षकांप्रमाणे पालक देखील डोळे लावून बसलेले दिसतात. परंतु, भारतासमोर असलेले लोकसंख्या लाभांशाचे आव्हान काही गंभीर मुद्दे अधोरेखित करणारे आहेत.
“कौशल्य विकसना’च्या नावाखाली आपण नेमके काय करतो याचे परीक्षण व्हावयास हवे.

“कुशल भारत’ सारख्या योजनांमुळे या मुद्द्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले नाही ना याबाबत नागरिकांनी सजग चिंतन करावयास हवे. एखादे कौशल्य शिकवणे, त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणे आणि तो रोजगार शाश्‍वत स्वरूपाचा असणे अशा प्रत्येक टप्प्याचा विचार आपणास करावयाचा आहे. आपण जे काही शिकतो ते आपल्या रुचीनुसार आहे ना हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने आणि सुरुवातीला पालकांनी देखील करणे आवश्‍यक ठरते. रोजगाराची संधी आणि शिक्षण याचा संबंध आपण लावू तसा लागतो. कधीतरी शिक्षणाने संधी निर्माण करता येते तर, कधीतरी संधीच्या मागे लागून केवळ त्यास आवश्‍यक शिक्षण घेण्यातच आयुष्य खर्ची जाऊ शकते. शिक्षणव्यवस्था हे केवळ एक माध्यम असून त्याच्या वापराने विद्यार्थ्यांच्या मनास नि विचारास दिशादर्शन करणे हे शिक्षकाचे कर्तव्य परीक्षा व गुणांच्या दुनियेत हरपत नाही ना याकडेही लक्ष देऊयात.

विद्यार्थ्याचा कल, रोजगार संधी आणि निवड करत असलेले क्षेत्र यांतील परस्परसंबंध उपरोक्‍त पुरस्कारांमुळे अधोरेखित होतो. आपण कालसुसंगत, आवश्‍यक कौशल्ये साध्य करणे आणि त्यानुसार अर्थार्जनाचा पर्याय निवडणे ही प्रक्रिया योग्य की अर्थार्जनास संधी उपलब्ध होईल या विचाराने शिक्षणाची वाट बदलणे हा पर्याय योग्य याचा विचार करणे ही काळाची गरज आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण

उपरोक्‍त पुरस्कार सोहोळ्यामध्ये केंद्रीय मानव संसाधन आणि विकास मंत्र्यांनी शालेय पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या शिक्षणव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार ही एक उल्लेखनीय बाब ठरणार आहे. या निमित्ताने, आंतरजालाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असली तरी तो शिक्षकासाठी पर्याय ठरू शकत नाही, असेही मंत्री महोदयांनी नमूद केले. प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय राबवून पाहताना इंटेल कंपनीने 2 वर्षांचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला. यावर आधारित काही प्रारूपेदेखील शालेय विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. पैकी, “हॅपिनेस गुरू’ नावाच्या प्रारूपाअंतर्गत नजीकच्या काळात विद्यार्थी नैराश्‍याच्या आहारी जातील का याबाबत अंदाज बांधता येतो. “सायबर डिटेक्‍टीव्ह’ नावाच्या प्रणालीच्या माध्यमातून सोशल मीडियावरील अप्रासंगिक किंवा अनुचित पोस्ट नेमक्‍या कोणत्या ते कळू शकते.

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द घडवता यावी या दृष्टीने प्रयत्न करत असलेल्या शिक्षकांना गौरविण्यात आले. मात्र, दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसारामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना मानवी स्पर्श देण्यात, त्यांच्या मनात शाळा आणि शिक्षकांबाबत आस्था निर्माण करण्यात आपण कमी पडणार नाही ना? काळाबरोबर प्रवास करताना ओलावा हरपणार नाही ना? यावर सुद्धा विचार करूयात.

मानव्यशास्त्रांची भूमिका

या अनुषंगाने, पुन्हा एकदा मानव्यशास्त्रांचे महत्त्व अधोरेखित होते. सर्व मानव्यशास्त्रीय अभ्यासशाखा मानवाचा सांगोपांग विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. सूक्ष्म ते स्थूल पातळीपर्यंत एखाद्या व्यक्‍तीची वैचारिक घडण कशी होते याचा संपूर्ण आढावा मानव्यशास्त्रे घेतात. विवक्षित परिस्थितीनुसार मानवाचे वर्तन कसे आकारीत होईल, त्याची प्रतिसाद देण्याची पद्धती, आव्हाने स्वीकारण्याची क्षमता या साऱ्याच प्रश्‍नांची उत्तरे मानव्यशास्त्रांच्या अभ्यासात मिळतात.

या शास्त्रांच्या अभ्यासाला, चिंतनाला बगल देऊन आपण अनेक दशके केवळ प्रवाहासह शैक्षणिक क्षेत्र निवडण्याची मानवनिर्मित प्रथा सुरूच ठेवली आहे. परंतु, आपल्याला नेमके कोणत्या क्षेत्रात काम करावयास आवडेल, कोणत्या क्षेत्रात आपण काम केले असता आपल्याला कामाचा कंटाळा येणार नाही, काम आणि जगणे या समानार्थी बाबी ठरतील असे सारेच व्यापक विचार प्रत्येक व्यक्‍तीच्या पातळीवर होणे गरजेचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here