भारत पाक सीमेवर भुयार

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाला एक भुयार आढळल्याने खळबळ उडाली आहे.त्यानंतर अशा स्वरूपाची अन्यत्र काही बांधकामे आहेत का? यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली आहे.
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या मार्गातून घुसखोरी झाली असण्याची शक्यता असून कोणीही या मार्गे येऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे आदेश सीमावर्ती कमांडर्सना दिले आहेत.
सीमेपासून भारताच्या बाजूने 50 मीटर आत उघडले जाणारे हे भुयार जम्मूमधील सांबा क्षेत्रात सीमा सुरक्षा दलाला गस्त घालत असताना गुरुवारी आढळले. दलाने त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या तोंडावर लावलेल्या वाळूच्या प्लास्टिक पोत्यांवर पाकिस्तानाचे शिक्के आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या भुयाराची तपासणी केली असता त्याच्या तोंडाच्या दिशेने 25 फूट खोल असल्याचे आढळले. त्यामुळे अशा स्वरूपाचे आणखी काही भुयारे आहेत का, याची तपासणी सुरू केली. पाकिस्तानमधून शस्त्रे आणि अंमलीपदार्थांच्या तस्करीसाठी याचा वापर होत असल्याचा संशय आहे.
दलाने जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये असे बोगदे शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे. पंजाबमध्ये अलीकडेच पाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यामुळे जम्मू, पंजाब, गुजरात आणि राजस्थानलगतच्या तीन हजार तीनशे किमी आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अतिसतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. भारतात घुसण्याच्या प्रयत्नात दहशतवादी असल्याचा सतर्कतेचा आदेश गुप्तचर खात्याने अलीकडेच दिला होता.
या दलाने जमिनीची तपासणी करणारी रडार तैनात करून संवेदनशील भागांत अशी भुयारे अथवा बोगदे आहेत का, याची तपासणी सुरू केली आहे. यापूर्वीही सीमा सुरक्षा दलाला अशी भुयारे आढळली होती.
वाळूच्या पोत्यांवर कराची नामोल्लेख
घटनास्थळावर 8 ते 10 वाळूची पोती मिळाली असून त्यावर कराची आणि शाकरगढ असे लिहिलेले आहे. त्यावर उत्पादनाची आणि वापरण्याच्या मुदतीची तारीख आहे. त्यावरून हे भुयार अलीकडेच बनवले असल्याचे अनुमान आहे. या भागापासून पाकिस्तानी छावणी 400 मीटरवर असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.





