TOP NEWS 10 : दिल्लीतील पुन्हा अग्नी तांडव ते पंतप्रधान मोदींच गुपित उघड…; वाचा टॉप 10 बातम्या
TOP NEWS 10 : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आमिरने खुलासा केला की, दि. 5 जुलै 2026 रोजी त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाह करणार आहे.

TOP NEWS 10
1 – “भारत आतापर्यंत एकाही देशापुढे झुकला नाही, हीच भारताची मोठी ताकद”; पुतिन यांनी अमेरिकेला सुनावले
भारत आतापर्यंत एकाही देशापुढे झुकला नाही. आपली अर्थव्यवस्था अधिक कशी मजबूत होईल, याकरिता भारत प्रयत्न करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव आहे. असे विधान रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी केले आहे.
भारत आपल्या राष्ट्रीय हिताच्या आधारावर निर्णय घेतो. हीच भारताची अत्यंत मोठी ताकद आहे. पुतिन यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला की, तुम्ही कितीही प्रयत्न करा रशिया आणि भारत कधीच दूर जाणार नाहीत.
2 – हरियाणामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली, अनेक कामगार अडकल्याची भीती (TOP NEWS 10)
हरियाणा राज्यातील फरिदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जेवर एक्सप्रेसवेवरील उड्डाणपुलाच्या बांधकामा दरम्यान अवजड क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
बांधकाम सुरू असताना क्रेनचा अचानक तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
3 – दिल्लीतील पुन्हा अग्नी तांडव.! झोपेतच आगीचा थरार, नोएडा सेक्टर ७५ मधील १२ व्या मजल्यावर भीषण आग
दिल्लीतील हॉटेल अग्निकांडात 21 जण होरपळल्यानंतर आता पुन्हा एकदा राजधानी हादरली आहे. नोएडामधील सेक्टर 75 येथील आयव्ही काउंटी सोसायटी मधील एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागली आहे.
12 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सकाळी सुमारे 7 वाजून 20 मिनिटांनी अचानक आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण फ्लॅट आगीच्या विळख्यात सापडला.
अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (TOP NEWS 10)
4 – फक्त क्रिकेट, राजकारण नाही..! ललित मोदींचा मोठा दावा; पंतप्रधानांशी संवादाचं गुपित उघड
देशातून फरार असलेले उद्योगपती आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे दावे केले आहेत.
आमच्यात फक्त क्रिकेटवर चर्चा व्हायची… ते क्रिकेटचे मोठे प्रशंसक असून गुजरातमधील क्रिकेट विकासात त्यांनी विशेष रस दाखवला आहे. त्यांचे संवाद फक्त क्रिकेटपुरते मर्यादित होते आणि त्यात राजकारणावर कोणतीही चर्चा होत नव्हती. असं ते म्हणाले.
5 – कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; पाच उमेदवारांची झाली बिनविरोध निवड (TOP NEWS 10 )
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने तटकरेंचा मार्ग मोकळा झाला.
बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये भाजपचे अरुण लखाणी, राष्ट्रवादीचे विक्रम काकडे आणि अनिकेत तटकरे, तर शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि दुष्यंत चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
6 – राज्यात अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याचे..! (TOP NEWS 10)
केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी महाराष्ट्रात सध्या मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना, यवतमाळ, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. (TOP NEWS 10)
दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी आणि नागपूरमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
7 – जेवणात किंवा औषधात भेसळ आहे? थेट तुकाराम मुंढेंना फोन करा; टोल फ्री क्रमांक जारी
राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, 102 जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे.
या बाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 आणि [email protected] ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
8 – हुंडई एक्सटरच्या किंमतीत मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री !
गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बजेट SUV म्हणून लोकप्रिय असलेली हुंडई एक्सटर आता महाग झाली आहे.
5.80 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या SUV गाडीसाठी येत्या जून महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारच्या किंमतीत सुमारे 5,700 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, जी सरासरी 0.91 टक्क्यांपर्यंत आहे.
तसेच HX3 आणि HX4 व्हेरिएंटच्या किंमतींमध्ये सुद्धा बदल करण्यात आले असून, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
9 – श्रेयस अय्यर भारताचा नवा टी-२० कर्णधार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीलाही संधी!
बीसीसीआय आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी ६ जून रोजी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. २०२८ ऑलिम्पिक आणि भविष्यातील नियोजनासाठी सूर्यकुमार यादवला हटवून स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाचे नवे कर्णधारपद सोपवले जाणार आहे.
तसेच, आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची पहिल्यांदाच संघात निवड निश्चित झाली आहे.
10 – “सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला नेहमीच खोटं ठरवलं जातं..”; अभिनेत्री शिल्पा शिंदेंनी ट्रोलर्सना सुनावलं.!
अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे त्या विशेष प्रसिद्ध झाल्या होत्या.
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदे यांनी काही जुने आरोप खोटे असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी शिल्पा शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, “सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला नेहमीच खोटं ठरवलं जातं. त्या कोणालाही खूश करण्यासाठी बोलत नाहीत आणि त्यांना स्वतःच्या नजरेत चांगलं राहणं महत्त्वाचं आहे. असं त्यांनी सांगितलं आहे.




