पुत्रजया (मलेशिया) : थायलंड आणि मलेशियाच्या पंतप्रधानांनी दोन्ही देशांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यास मान्यता दिली आहे. तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदी लागू करण्यास दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली आहे. असे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सांगितले आहे. आसियानचे अध्यक्षपद सध्या मलेशियाकडे आहे. आसियान गटाचे अध्यक्ष या नात्याने इब्राहिम यांनी थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी केली होती. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना त्यांनी मलेशियामध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले होते. परिस्थिती अधिक चिघळू नये आणि स्थायी शांतता कायम रहावी यासाठी चर्चेतून तोडगा काढण्यात यावा, याचा आग्रह इब्राहिम यांनी धरला होता. त्यानुसार कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत आणि थायलंडचे प्रभारी पंतप्रधान फुमताम वेचायचाय यांनी तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीला मान्यता दिली. ही युद्धबंदी २८ जुलैच्या मध्यरात्रीपासून ही युद्धबंदी लागू होणार आहे, असे संयुक्त निवेदनामध्ये इब्राहिम यांनी म्हटले आहे. हुन मानेत आणि फुमताम यांनी या बैठकीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. चर्चेच्या निष्कर्षाची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून निष्कर्षाला सहमती दर्शवली. तात्काळ युद्धबंदी लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील बैठक होणार आहे. सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर त्यावेळी चर्चा केली जाणार आहे. मलेशिया, कंबोडिया आणि थायलंडच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांना स्थायी शांततेसाठी युद्धबंदीची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी एक सविस्तर यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही इब्राहिम अन्वर यांनी सांगितले. आता थायलंड आणि कंबोडियादरम्यानचे द्विपक्षीय संबंध लवकरच पुर्वीप्रमाणे सामान्य होतील. दोन्ही बाजूंकडील विस्थापित झालेले सुमारे ३ लाख गावकरी पुन्हा आपल्या घरी परतू शकतील. आता दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांनी म्हटले आहे.परिस्थितीवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याच्या थायलंडच्या इच्छाशक्तीमुळेच हा तोडगा काढला जाऊ शकला, असे थायलंडचे प्रभारी पंतप्रधान यांनी म्हटले आहे. हिंसाचार उसळण्याचे कारण भूसुरुंगाचा स्फोट थायलंड आणि कंबोडियामधील ८०० किलोमीटर लांबीची सीमा अनेक दशकांपासून वादग्रस्त आहे. परंतु भूतकाळात झालेले संघर्ष मर्यादित आणि अल्पकालीन राहिले आहेत. गुरुवारी सीमाभागातल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात थायलंडचे ५ सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर सीमेवरच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. मात्र संघर्ष सुरू केल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर केला जात होता. त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या किमान ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २ लाख ६०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. तर थायलंडने कंबोडियाच्या सीमेला लागून असलेल्या सर्व बॉर्डर क्रॉसिंग बंद केले आहे. केवळ कंबोडियाच्या प्रवासी कामगारांना आपल्या घरी परत जाऊ दिले जाते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचार सुरू राहिल्यास दोन्हीपैकी कोणाशीही व्यापारी करार केला जाणार नाही, असा थेट इशारा दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांनी युद्धबंदी स्वीकारली आहे.