देऊळगाव रसाळ येथे विहिरीची दरड कोसळून चुलते-पुतण्याचा मृत्यू; बारामती तालुक्यातील दुर्घटना
Baramati News : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक माती आणि दगडांची मोठी दरड कोसळून घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत चुलते आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.

बारामती : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना माती व दगडांची दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चुलते-पुतण्याचा मृत्यू झाला. मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय ५०) आणि अमोल धनाजी रसाळ (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे देऊळगाव रसाळ परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देऊळगाव रसाळ येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. त्याचवेळी अचानक विहिरीच्या बाजूची माती व दगडांचा मोठा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली मच्छिंद्र रसाळ आणि अमोल रसाळ दबले गेले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली.
एकाच कुटुंबातील चुलते-पुतण्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने रसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेमुळे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.





