Village Committee Election : ‘या’ राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव
Village Committee Election : त्रिपुरातील 587 विलेज कमिटींच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाले. टिपरा मोथा आणि भाजपने मिळून 94 टक्के जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 14 जागा मिळाल्या.

Village Committee Election : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यानंतरही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्रिपुरातील नुकत्याच झालेल्या ग्राम समिती (विलेज कमिटी) निवडणुकीत एनडीएने मोठे यश मिळवले. एनडीएमध्ये सहभागी असलेल्या टिपरा मोथा पार्टीने सर्वाधिक जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली.
त्रिपुरा निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील 587 ग्राम समितींसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये 2,634 निर्वाचन क्षेत्रे आणि 4,597 जागा होत्या. या निवडणुकीत मतदारांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले.
1,644 जागा बिनविरोध –
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 167 संपूर्ण ग्राम समिती बिनविरोध निवडल्या गेल्या. या समितींमधील एकूण 1,644 जागांवर मतदानाची गरज पडली नाही. याशिवाय तीन जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 4,594 जागांसाठी मतदान झाले.
टिपरा मोथाला 3,428 जागा –
निवडणुकीत टिपरा मोथा पार्टीने 3,428 जागा जिंकल्या. हे एकूण जागांच्या सुमारे 74.62 टक्के आहे. भाजपने 859 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. टिपरा मोथा आणि भाजपने मिळून सुमारे 94 टक्के जागांवर विजय मिळवला.
अपक्ष उमेदवारांना 173 जागा मिळाल्या. विरोधी पक्षांमध्ये सीपीआय(एम)ला 87 जागा, आयपीएफटीला 33 जागा, तर काँग्रेसला केवळ 14 जागा मिळाल्या. या आकडेवारीत बिनविरोध निवडून आलेल्या जागांचाही समावेश आहे.
आसाममध्येही भाजपचा विजय –
याच आठवड्यात आसाममधील सिलचर महापालिका निवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. येथे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 42 पैकी 34 जागा जिंकल्या. सिलचर महापालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीत एनडीएने दमदार सुरुवात केली. काँग्रेसला केवळ 2 जागा, तर अपक्ष उमेदवारांना 6 जागा मिळाल्या.
ग्राम समितींचे महत्व काय ?
त्रिपुरातील व्हिलेज कमिटी (ग्राम समिती) या आदिवासी स्वायत्त क्षेत्रातील स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहेत. गावातील विकासकामे राबवणे, रस्ते व पाणी व्यवस्था, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, विहिरी-तलावांची देखभाल, जन्म-मृत्यू नोंदी आणि स्थानिक गरजांशी संबंधित कामे करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.





