Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई
Pune Lok Adalat : पुण्यातील लोकअदालतीत मोटार अपघाताचा दावा तडजोडीने निकाली. ३२ वर्षीय शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १ कोटी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार.

Pune Lok Adalat : घरातील कर्ता असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेल्या कुटुबियांना दावा दाखल केल्यापासून १ वर्षाच्या आत दिलासा मिळाला आहे. कुटुबियांना १ कोटी १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
शनिवारी (दि.१२) झालेल्या लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा न्यायाधीश आर.के. राजेभोसले, ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनलसमोर तडजोडीअंती हा दावा निकाली निघाला.
तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील ॲड. पांडुरंग निवृत्ती बोबडे, ॲड. प्रज्वल गुंजाळ, रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲड. ऋषिकेश गानू, कंपनीचे राष्ट्रीय प्रबंधक आशिष राऊत, मुख प्रबंधक अभिषेक डबली, अधिकारी भारत केदारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
३२ वर्षीय माधव (नाव बदलले आहे) यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई वडिलांनी दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायाधिकरण येथे ॲड. पांडुरंग निवृत्ती बोबडे आणि ॲड. प्रज्वल गुंजाळ यांच्यामार्फत सप्टेंबर २०२५ मध्ये दावा दाखल केला होता.
आयशरची विमा कंपनी असलेल्या रॉयल सुंदरम इन्शुरन्सच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. ३० जुलै २०२५ रोजी द्रुतगती महामार्गावरून माधव दुचाकीवरून सातारा येथून पुण्याकडे येत होते. त्यावेळी समोरून डिव्हायडर तोडून रॉंग साईडने आलेल्या आयशरने माधव यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी इतर दोन दुअचाकी आणि एका पिकअपलाही आयशरने धडक दिली होती. या अपघातत माधव यांचा मृत्यू झाला. ते ३२ वर्षांचे होते.
शासकीय सेवेत त्यांना दरमहा ७७ हजार २७६ रुपये पगार होत. त्यांचे वय, पगार आणि अवलंत्वाचा विचार करता अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. हा दावा तजजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला होता. यामध्ये तडजोड झाली. विशेष म्हणजे तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.





