Mithun Manhas : BCCI च्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड! कोण आहेत मन्हास? जाणून घ्या

Mithun Manhas elected as new BCCI president : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (AGM) मन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसांपासून मन्हास यांच्या नावाची चर्चा सुरू होती. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर पोस्ट करत मन्हास यांच्या नियुक्तीची माहिती दिली.
जितेंद्र सिंह म्हणाले, “मिथुन मन्हास यांना बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील माझा मूळ जिल्हा असलेल्या पूर्व डोडा भागासाठी हा रविवार किती स्मरणीय ठरला! अवघ्या काही तासांच्या अंतराने किश्तवाडची कन्या शीतलने जागतिक विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली.”
A momentous occasion to celebrate!
Mithun Manhas has been officially declared as the new President of the ‘Board of Control for Cricket in India’ #BCCI.
What a providential Sunday for the erstwhile district of Doda, one of the remotest parts of Jammu & Kashmir, which incidentally… pic.twitter.com/I6PpEMtH2T— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 28, 2025
प्रथमच अनकॅप्ड खेळाडूला जबाबदारी –
45 वर्षीय मिथुन मन्हास हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे तिसरे क्रिकेटपटू ठरले आहेत. त्यांनी माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची जागा घेतली. यापूर्वी रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली हे क्रिकेटपटू बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले आहेत. विशेष बाब म्हणजे, मन्हास हे अध्यक्षपद भूषवणारे पहिले अनकॅप्ड खेळाडू आहेत.
हेही वाचा – IND vs PAK : आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय निश्चित! काय आहे कारण? जाणून घ्या
कोण आहेत मिथुन मन्हास?
12 ऑक्टोबर 1979 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेल्या मिथुन मन्हास यांनी 1997-98 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी 157 प्रथम श्रेणी सामन्यांत 9714 धावा केल्या, यात 27 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सरासरी धावगती 45.82 इतकी आहे. 130 लिस्ट-ए सामन्यांत त्यांनी 5 शतके आणि 26 अर्धशतकांसह 4126 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये 91 सामन्यांत 1170 धावा आणि 70 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत 55 सामन्यांत 514 धावा केल्या.
दिल्लीला पटकावून दिलंय रणजी जेतेपद –
त्या काळात भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या दिग्गज फलंदाजांचा भरणा होता, त्यामुळे मन्हास यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करत आपली चमक दाखवली. 2007-08 च्या रणजी ट्रॉफी मोसमात मन्हास यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीने विजेतेपद मिळवले. या हंगामात त्यांनी फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत 57.56च्या सरासरीने 921धावा फटकावल्या. त्यांच्या या शानदार खेळीने दिल्लीला रणजी ट्रॉफी जिंकण्यात निर्णायक योगदान दिले.





