IND vs PAK : आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय निश्चित! काय आहे कारण? जाणून घ्या

IND vs PAK 28th date lucky for India : आशिया कप 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. कारण भारत-पाकिस्तान आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. हा सामना 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाक सामना केवळ दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील तीव्र लढत नसेल, तर भारतीय क्रिकेट संघासाठी ही तारीख विशेष महत्त्वाची आहे.
भारतीय संघाचे 28 तारखेशी आहे खास संबंध –
इतिहास साक्षी आहे की, 28 तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाने नेहमीच विजयाचा झेंडा फडकवला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 28 तारखेला झालेल्या मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. पहिल्यांदा दोन्ही संघ 28 डिसेंबर 2012 रोजी टी-20 सामन्यात भिडले होते. त्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानला 11 धावांनी पराभूत केले होते.
त्यानंतर, 2022 मध्ये एशिया कपच्या टी-20 सामन्यात 28 ऑगस्टला भारताने पुन्हा बाजी मारली आणि 4 गडी राखून विजय मिळवला. या दोन्ही विजयांनी 28 तारीख ही भारतीय चाहत्यांसाठी शुभ तारीख बनवली आहे. आता, 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष यावर असेल की, भारत ही तारीखेची जादू कायम ठेवतो का?
भारत-पाक सामना क्रिकेटचा महासंग्राम –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना केवळ खेळ नसून भावनांचा उद्रेक आहे. दोन्ही देशांचे आणि जगभरातील इतर चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहतात. या आवृत्तीत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी गट टप्प्यात आणि सुपर फोरमध्येही या दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती. या दोन्ही वेळी भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाकडे विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे.
हेही वाचा – ISSF Junior World Cup : रश्मिका-कपिलची कमाल! ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदकाची लयलूट
भारताचे लक्ष्य 9 व्या विजेतेपदावर –
भारतीय संघाचे लक्ष्य नव्यांदा विजेतेपद मिळवण्यावर आहे. हा संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने केवळ दोन वेळा, म्हणजे 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. या सामन्याकडे केवळ क्रिकेटप्रेमींचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत 28 तारखेचा विजयी इतिहास कायम ठेवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे





