Unauthorized Schools: शिक्षण विभागाचा अजब कारभार! शेकडो शाळांमधून फक्त एकच अनधिकृत? बाकीच्या शाळा गेल्या कुठे?
Unauthorized Schools: पूर्व हवेली तालुक्यातील अनधिकृत शाळांच्या यादीवरून वाद; सातत्याने तक्रारी असूनही केवळ एकाच शाळेवर कारवाई झाल्याने संशय व्यक्त.

Unauthorized Schools – पूर्व हवेली तालुक्यातील अनधिकृत शाळांच्या यादीबाबत शिक्षण विभागाचा कारभार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तालुक्यात अनेक शाळा नियमबाह्यपणे सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा असताना शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत केवळ एका शाळेचे नाव समोर आल्याने नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गावोगावी सुरू असलेल्या काही शाळांबाबत सातत्याने तक्रारी होत असताना आणि स्थानिक स्तरावर अनेकदा प्रश्न उपस्थित होत असताना यादीत फक्त एका शाळेचा समावेश झाल्याने अनधिकृत शाळा नेमक्या कुठे गायब झाल्या, असा सवाल उपस्थित होत आहे. नियमांनुसार केंद्रप्रमुखांकडून शाळांची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित असते. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी न करताच कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र रंगविले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पूर्व हवेलीसारख्या मोठ्या शैक्षणिक क्षेत्रात केवळ एकच शाळा अनधिकृत कशी असू शकते, असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. काही शाळांमध्ये अधिकारी वर्गाच्या नियमित भेटी, पाहण्या आणि कार्यक्रम होत असतानाही अनधिकृततेच्या मुद्द्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे एकाला नियम आणि दुसर्याला मुभा, एकावर कारवाई तर दुसर्यावर कृपादृष्टी अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष कड यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, हवेली तालुक्यात अनेक शाळांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना एकाच शाळेवर कारवाई होणे संशयास्पद आहे. केंद्रप्रमुखांनी सादर केलेल्या अहवालात काही गौडबंगाल आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
“केंद्रप्रमुखांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे अनधिकृत शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र याबाबत पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेऊन आवश्यक असल्यास सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येईल.”
– हेमंतकुमार खाडे, गटशिक्षणाधिकारी




