Loni Kalbhor News – पूर्व हवेलीतील लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातील कचरा प्रश्नाने आता रौद्र रूप धारण केले आहे. मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला २६ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे हा प्रश्न चव्हाट्यावर आला. सलग चार दिवस धुमसणाऱ्या या आगीच्या धुरामुळे संपूर्ण परिसर व्यापला होता, ज्याचा सर्वाधिक फटका एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठातील विद्यार्थ्यांना बसला. या घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या ‘कचरा बंद’ आंदोलनामुळे पूर्व हवेलीत मोठी ‘कचरा कोंडी’ निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी कचरा टाकणे बंद करण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे लोणी काळभोर आणि कदमवाकवस्तीमधील कचऱ्याच्या गाड्यांना एमआयटी परिसरातून जाण्यास बंदी घातली होती. यामुळे दोन्ही गावांत कचरा साचून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला. ग्रामस्थ आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या एकजुटीनंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले, तरी कचऱ्याची धग अद्याप कायम आहे. शेवाळेवाडी व मांजरी हद्दीत महामार्गावर कचरा टाकला जात आहे. हा कचरा एका कंपनीकडुन उचलण्यात येत असल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी आहे. कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर हद्दीत कचऱ्याचा प्रश्न तीव्र आहे. कदमवाकवस्ती हद्दीतील पालखी तळाच्या बाजुला कचरा टाकला जातो. लोणी स्टेशन परिसरात तशीच परिस्थिती आहे. लोणी व कदमवाकस्ती हद्दीतील ओढ्याशेजारी नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. नायगावात कचरा गायरानात टाकत आहेत. सोरतापवाडी येथील कचरा नायगावात खाजगी जागा भाडयाने घेऊन तिथे टाकला जातोय. तर, ऊरूळी कांचन येथे देवस्थानच्या जागेत टाकला जात आहे. उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर महामार्गावर ओढ्या शेजारी कचरा टाकून, तो वेळोवेळी पेटवून दिला जात आहे. कोरेगाव मुळ येथे गायरान जमिन, महामार्गाच्या कडेला टाकला जात आहे. तर, शिंदवणे हद्दीच्या शेजारी कालव्याच्या कडेला कचरा पेटवून देत आहेत. यासाठी एका मोठ्या उद्योजकाची आणि सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्तीसाठी सरकारी जागेत प्रकल्प उभारण्याचा पाठपुरावा सुरू असला, तरी सरकारने तातडीने लक्ष घालून एखादा मोठा प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिक करत आहेत. शास्त्रोक्त प्रकल्पाची नितांत गरज- पूर्व हवेलीत पुरेशी सरकारी जमीन उपलब्ध आहे. या ठिकाणी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून त्यापासून वीज निर्मिती, सेंद्रिय खत किंवा प्लास्टिक पुनर्वापर (Recycling) करणारे प्रकल्प उभे राहणे काळाची गरज आहे. “जमिनींना सोन्याचे भाव आले, मात्र कचऱ्याचे नियोजन शून्य आहे,” अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.