Umrao jaan Completed 45 years: ‘उमराव जान’ला ४५ वर्षे पूर्ण: रेखाला मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, स्मिता पाटील होती पहिली पसंत

Umrao jaan Completed 45 years : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘उमराव जान’. २ जानेवारी १९८१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटासाठी रेखा यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विशेष म्हणजे, ‘उमराव जान’साठी सुरुवातीला रेखा नव्हे तर अभिनेत्री स्मिता पाटील या दिग्दर्शकांची पहिली पसंती होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते मुजफ्फर अली होते. त्यांना अशी अभिनेत्री हवी होती जी शायरा आणि तवायफ या दोन्ही भूमिका प्रभावीपणे साकारू शकेल. सुरुवातीला त्यांनी स्मिता पाटील यांचा विचार केला होता. मात्र एकदा रेखा यांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या दोन खास गोष्टी दिसल्या आणि त्यांनी रेखाची निवड केली.
‘उमराव जान’साठी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी एक मुलाखतीत सांगितले होते की, हा पुरस्कार मिळेल इतकी मेहनत आपण केली असे त्यांना वाटत नव्हते. बीबीसी एशियन युनिटशी १९८६ मध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या भूमिकेसाठी त्यांनी कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतले नव्हते. उर्दू भाषा त्यांनी शब्दशः शिकली नव्हती आणि आजही काही शब्दांमध्ये त्यांना अडचण येते, असेही त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले होते.
रेखा यांनी हेही सांगितले की ‘उमराव जान’च्या शूटिंगदरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्या मानसिक वेदना त्यांच्या चेहऱ्यावर चित्रपटात दिसून येतात, असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते, या चित्रपटात काहीतरी वेगळे होते, म्हणूनच तो आजही लक्षात राहतो. कदाचित हे सर्व नियतीनेच घडवून आणले, असेही त्यांनी म्हटले होते.
दिग्दर्शक मुजफ्फर अली यांच्या कामाबद्दल बोलताना रेखा म्हणाल्या की, ते एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्यामुळे रंगसंगती, कपडे, टेक्स्चर आणि पार्श्वभूमी याकडे त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिले. याच डिटेलिंगमुळे ‘उमराव जान’ हा चित्रपट आजही एक क्लासिक म्हणून ओळखला जातो.





