Uma Bharti : पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवेन; उमा भारतींनी व्यक्त केली इच्छा

भोपाळ : भाजपने आदेश दिल्यास वर्ष २०२९ मधील लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी दर्शवली आहे. अर्थात, केवळ उत्तरप्रदेशच्या झांसी मतदारसंघातूनच लढण्याची अटही त्यांनी पुढे केली आहे. उमा भारती काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे चित्र आहे. अर्थात, मी राजकारणापासून दुरावलेले नाही. योग्य वेळी निवडणुकीच्या मैदानात दिसेल, असे त्यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते.
त्यानंतर त्यांनी शनिवारी एका ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मांडलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी स्वत: रविवारी सोशल मीडियावरून दिली. झांसीचा समावेश असलेला बुंदेलखंड विभाग माझ्यासाठी भावनिक स्वरूपाचे घर आहे. तेथील जनतेशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास नक्कीच तिथून निवडणूक लढवेन, अशी स्पष्टोक्ती पत्रकारांशी बोलताना केल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या भाजपचे खासदार अनुराग शर्मा झांसीचे प्रतिनिधित्व करत आहेत. उमा भारती यांनी वर्ष २०१४ मधील निवडणुकीत झांसी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्या मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. पुन्हा निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास मध्यप्रदेशऐवजी उत्तरप्रदेशला पसंती देणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.





