रशियाच्या एक हजार चौरस किलोमीटरवर युक्रेनचा ताबा; कुर्स्क प्रांताबाबत युक्रेनच्या कमांडरचा दावा

किव्ह – रशियाच्या कुर्क्स प्रांतात युक्रेनच्या सैन्याने जोरदार मुसंडी मारली असून या प्रांतातील तब्बल एक हजार चौरस किलोमीटरच्या भूभागावर युक्रेनच्या सैन्याने ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या लष्करी कमांडरनी हा दावा केला आहे. कुर्स्क प्रांतात युक्रेनच्या सैन्याने केलेल्या या कारवाईबद्दल प्रथमच युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी उघडपणे भाष्य केले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांच्या टेलिग्राम चॅनलवर सोमवारी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जनरल ऑलेक्झांडर सिर्स्की यांनी हे ही माहीती दिली. युक्रेनच्या सैन्याने आपले उद्दिष्ट योग्यप्रकारे साध्य केले आहे. या बागात अजूनही जोरदार धुमश्चक्रि सुरू असल्याचेही जनरल सिर्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे सैन्य जवळपास १२ किलोमीटर आतमध्ये घुसले आहे, असे कुर्स्क प्रांताचे गव्हर्नर अलेक्सी स्मरनोव्ह यांनी म्हटले आहे. या कारवाईत १२ नागरिकांचा मृत्यू झाला असून १० मुलांसह १२१ जण जखमी झाले आहेत. सुमारे १ लाख २१ हजार लोकांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यात आले आहे. एकूण १ लाख ८० हजार लोकांच्या स्थलांतराचे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
जवळपास आठवडाभर सुरू असलेल्या या जोरदार चढाईत युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना रशियाच्या सैन्याची अजूनही त्रेधा होते आहे. युक्रेनने नागरी भागात केलेल्या घुसखोरीमुळे तेथील जवळपास एक लाख रबिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. रशियाने युक्रेनच्या डोनबास भागातल्या कारवाईला रोखण्यासाठी रशियाच्या दुसऱ्या भागात चढाई केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील शांतता चर्चेचे भविष्य अधिक धूसर झाले आहे.
वाटाघाटींमध्ये महत्व वाढवण्याचा प्रयत्न
युक्रेनने कुर्स्क प्रांतात केलेला हा हल्ला म्हणजे वाटागाटींमध्ये युक्रेनचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दिली आहे. सोमवारी त्यांनी रशियाच्या वरिष्ठ संरक्षण आणि लष्करी अदिकाऱ्यांची बैठक घेतली आणि युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या योजनांविषयी चर्चा केली.





