किव्ह – दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या दारुगोळ्याच्या गोदामांवर हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. या दारुगोळ्याच्या गोदामांचे मोठमोठे स्फोट होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रशियाच्या ताब्यातील नोव्हा काखोव्का येथे रशियाच्या दारुगोळ्याच्या गोदामांवर रॉकेट हल्ले करण्यात आल्याचे युक्रेनच्या सैन्याच्या दक्षिण विभागाने म्हटले आहे.
हे ठिकाण दक्षिण समुद्रातील कारकोव्ह या बंदराच्या शहरापासून पूर्वेकडे 35 किलोमीटर अंतरावर आहे. कारकोव्ह शहरावरही रशियाच्या सैन्याचा ताबा आहे. अमेरिकेकडून पुरवण्यात आलेल्या मल्टिपल लॉंच मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम किंवा हमार्सचा वापर युक्रेनने या हल्ल्यासाठी केल्याचे समजते आहे. रशियाने ताब्यात घेतलेला आपला भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी आक्रमण केले जाईल, असे युक्रेनने अलिकडेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
सोळ मीडियावरील स्फोटांबाबत रशियाने वेगळेच स्पष्टिकरण दिले आहे. हे स्फोट खनिज खतांच्या साठ्याचे स्फोट झाल्याचे रशियाने म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये बाजार, रुग्णालय आणि घरांचे नुकसान झाल्याचेही रशियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या रॉकेट हल्ल्यामुळे आतोनात नुकसान झाल्याचे उपग्रहाद्वारे प्राप्त छायाटित्रामध्ये दिसून आले आहे. अमेरिकेने दिलेली 8 हमार्स सिस्टीम युक्रेनकडे आहेत. अमेरिकेकडून आणखीन 4 हमार्स सिस्टीम युक्रेनला दिली जाणार आहेत. अचूक माऱ्यासाठी ही यंत्रणा प्रसिद्ध आहे.