Russia-Ukraine Drone : युक्रेनने डागलेली एक हजार ड्रोन रशियाने पाडली
सलग दुसऱ्या रात्री युक्रेनकडून मोठा ड्रोन हल्ला रशियावर करण्यात आला होता. तो निष्फळ ठरवण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे.

Russia-Ukraine Drone – युक्रेनने रशियावर डागलेली तब्बल एक हजार ड्रोन पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या हवाई संरक्षण दलाने रात्रभरात रशियाच्या १९ प्रदेशांवर आणि रशियाच्या ताब्यातील क्रिमियावर १,०१७ युक्रेनियन ड्रोन रोखल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले.
सलग दुसऱ्या रात्री युक्रेनकडून मोठा ड्रोन हल्ला रशियावर करण्यात आला होता. तो निष्फळ ठरवण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाच्या बेलगोरोड सीमावर्ती प्रदेशात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात पाच जण जखमी झाले.
तर रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या माऱ्यामध्ये किमान तिघेजण ठार झाले आणि डझनभर लोक जखमी झाले आहेत. युक्रेनमधील ओडेसा परिसरात एका १४ मजली अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर झालेल्या हल्ल्यात आग लागली आणि गाड्यांचे नुकसान झाले, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
या प्रदेशात इतरत्र झालेल्या हल्ल्यामुळे एका शेताचे नुकसान झाले आणि खेळणी व घरगुती उपकरणे ठेवलेल्या गोदामांना मोठी आग लागली. या आगीत आणखी दोन जण जखमी झाले, असे युक्रेनच्या सरकारी आपत्कालीन सेवेने सांगितले.
झापोरिझियामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागावर झालेल्या हवाई बॉम्ब हल्ल्यानंतर बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून एका १४ वर्षीय मुलीला जिवंत बाहेर काढले. या मुलीच्या आईचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जण जखमी झाले. या हल्ल्यात घरे उद्ध्वस्त झाली आणि इतर इमारतींचेही नुकसान झाले, असे प्रांतीय गव्हर्नरांनी सांगितले.
शनिवारी रात्री उशिरा, मध्य युक्रेनच्या पोल्टावा प्रदेशातील क्रेमेन्चुक शहरात रशियाच्या ड्रोनने एका अपार्टमेंट इमारतीच्या आवारावर हल्ला केला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले.






