Ujani Dam Water: उजनी उणे २५ टक्क्यांवर! पाणी संपलं, पण संघर्ष नाही; धरणाच्या काठावर जीवघेणा खेळ
Ujani Dam Water: एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर; उभी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन ते तीन विद्युत पंपांची जोडणी.

Ujani Dam Water – उजनी धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला असून सध्या धरणात उणे २५. २२ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यातच ‘एल निनो‘च्या प्रभावामुळे राज्यात मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी पाण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. सध्या शेतातील उभी पिके जगवणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले असून, उजनीच्या काठावर पाण्यासाठीचा संघर्ष पाहावयास मिळत आहे. अनेकांनी नवीन पिकांच्या लागवडीसाठी शेते नांगरून ठेवली आहेत, मात्र पुरेशा पाण्याअभावी शेतकरी पेरणी करण्याचे धाडस करत नाहीत.
दुसरीकडे, उभी पिके हातातून जाऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. धरणाचा पाणीसाठा वेगाने मागे गेल्यामुळे एका विद्युत पंपाने पाणी शेतातील पिकांपर्यंत पोहोचवणे अशक्य झाले आहे. यावर पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन विद्युत पंप एकापुढे एक बसवून पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पाणी लांबपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांनी चारी (खंदक) खणण्याचा पर्याय निवडला आहे.

पळसदेव: उजनी काठावर कोरड्या पडत चाललेल्या पात्रातून पिकांसाठी पाणी उपसताना शेतकऱ्यांचा सुरू असलेला संघर्ष.
त्यामुळे सध्या उजनीच्या काठावर ठिकठिकाणी पाईप्स आणि विद्युत केबल्सचे मोठे जाळे तयार झाल्याचे चित्र आहे. हे विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी नदीकाठच्या एकाच जागेवर अनेक विद्युत रोहित्र (डीपी) अत्यंत धोकादायक स्थितीत बसवण्यात आले आहेत. उघड्या केबल्स आणि पाण्याचा संपर्क यामुळे येथे काम करताना शेतकऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, परिस्थिती कितीही बिकट आणि जीवघेणी असली, तरी तो धोका पत्करून बळीराजा पिके वाचवण्यासाठी रात्रंदिवस राबत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भीषण परिस्थिती
मागील वर्षी याच काळात उजनी धरणात सुमारे ७२ टक्के इतका समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शेतकरी पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “लवकर पाऊस पडून उजनी धरण पूर्ववत भरावे आणि पाण्यासाठी सुरू असलेला हा जीवघेणा संघर्ष थांबवावा,” अशीच आर्त प्रार्थना सध्या उजनीकाठचा शेतकरी देवाकडे करत आहे.





