El Nino impact : खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट! यंदा कमी पावसाचा अंदाज; कृषी तज्ज्ञांचा मोठा सल्ला
El Nino impact : पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न; माती परीक्षण, संतुलित खत वापर आणि आंतरपीक पद्धतीवर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन.

El Nino impact – आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट असून, यंदा सरासरीपेक्षा कमी व खंडित पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने “संतुलित खतांचा वापर व एल-निनो जनजागृती मोहीम” युद्धपातळीवर राबवली जात आहे.
या मोहिमेंतर्गत पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील भैरवनाथ मंदिराजवळ शनिवारी (दि. ६) शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जाधववाडी येथील अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे सुनील नाळे यांनी सीताफळ व अंजीर लागवड आणि बहार व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच कृषी सहाय्यक अधिकारी दिपाली कदम यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिसर्वे-१ चे उप-कृषी अधिकारी सचिन जगताप यांनी केले. या कार्यक्रमास पिसर्वेचे मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्मिता वर्पे, ‘अफार्म’ संस्थेचे कृषी अधिकारी अमितकुमार मेहत्रे, प्रकल्प अधिकारी अजय ननावरे, सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार, माजी सरपंच रामचंद्र खेडेकर,

सिंगापूर (ता. पुरंदर) : येथे कृषी विभागाकडून एल निनोच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करताना कृषी अधिकारी आणि उपस्थित शेतकरी बांधव.
दशरथ लवांडे, रामभाऊ उरसळ, प्रगतशील शेतकरी समील इंगळे, पोलीस पाटील यादवेंद्र उरसळ, माजी खजिनदार काळूराम लवांडे, अंकुश लवांडे, बाळासाहेब कोरडे, सोमनाथ कोरडे, दिलीप वारे, पांडुरंग बंड, सीआरपी नितीन वारे, महिला बचत गट सीआरपी स्नेहल लवांडे, आशा स्वयंसेविका रूपाली झेंडे यांच्यासह महिला व पुरुष शेतकरी, कृषी व पशूसखी आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी सरपंच दशरथ लवांडे यांनी मानले.
१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको
कृषी विज्ञान केंद्र (बारामती) चे शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी प्रथम माती परीक्षण करूनच शिफारशीनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांसोबत शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि जैविक खतांचा वापर वाढवावा, ज्यामुळे जमिनीत प्रदीर्घ काळ ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. ‘एल निनो’च्या धोक्यामुळे भात किंवा ऊस यांसारखी जास्त पाणी लागणारी पिके टाळून कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन,
मूग, उडीद, तूर, बाजरी आणि कापूस या पिकांना प्राधान्य द्यावे. एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून निसर्गाच्या लहरीपणामुळे एक पीक धोक्यात आले तरी दुसरे पीक शेतकऱ्याला आर्थिक आधार देईल. जोपर्यंत किमान १०० मिमी पाऊस होत नाही आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत खरीपाची पेरणी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.


