पुणे | यूजीसी नेट परीक्षा आता ऑनलाइन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “नेट’ पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षा आॅफलाइन न घेता आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.
याबाबतचे परिपत्रक “एनटीए’ने प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी ही नेट परीक्षा अनिवार्य आहे. यापूर्वी “एनटीए’ने यूजीसी नेट परीक्षा ऑनलाइन संगणक-आधारित चाचणी मोडमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
त्यानुसार 18 जून रोजी झालेली “एनटीए’ नेट ऑफलाइन घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता सुधारित परीक्षेच्या तारखा जाहीर करुन, ती ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. या व्यतिरिक्त रिसर्च फेलोशिप मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली सीएसआयआर यूजीसी नेट दि. 25 ते 27 जुलै दरम्यान आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे “एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले.





