UGC NET 2025 : नेट’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! अर्ज करण्यासाठी ही आहे अंतिम मुदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नेट परीक्षा दि. ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) देण्यात आली.या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०२५ आहे. अर्जासोबतच परीक्षा शुल्क भरण्याचीही अंतिम मुदत हीच आहे. अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास १० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान लिंक उपलब्ध राहणार आहे.
यूजीसी-नेट परीक्षा एकूण ८५ विषयांमध्ये घेतली जाईल. परीक्षेचे स्वरूप दोन पेपरचे असून, हे दोन्ही पेपर एकाच सत्रात तीन तासांच्या कालावधीत घेतले जातील. परीक्षेत १५० वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) प्रश्न विचारले जातील आणि एकूण गुणसंख्या ३०० असेल. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी परीक्षेच्या १० दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. सविस्तर माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





