T20 World Cup 2024 : युगांडाचा खेळाडू सर्वात वयस्कर तर ‘या’ देशाचा खेळाडू सर्वात तरुण; दोघांच्यात तब्बल 25 वर्षांचा फरक…

T20 World Cup 2024 : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विश्वचषक 2007 साली झाला. आतापर्यंत आठ टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत, परंतु 2024 चा वर्ल्ड कप सर्वात खास असणार आहे. या स्पर्धेत विविध 20 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारत हा सध्या जगातील नंबर 1 टी-20 संघ आहे, परंतु यावेळी अनेक सहयोगी देशांनाही संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंपासून तरूण खेळाडूही सहभागी होत आहेत. त्यामुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडूच्या वयातील फरक जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल. त्यांच्या वयात 25 वर्षांचा फरक आहे.
सर्वात वयस्कर खेळाडू
टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वात वयस्कर खेळाडूचे नाव फ्रैंक नसुबुगा (Frank Nsubuga) आहे, जो युगांडाकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँकचे वय 43 वर्षे 254 दिवस आहे आणि त्याने 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, जेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता.
त्याने आपल्या देशासाठी क्रिकेट खेळून 27 वर्षे झाली आहेत, हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. 2011 पासून तो युगांडाच्या संघाकडून नियमित खेळत आहे आणि युगांडा टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.
सर्वात तरुण खेळाडू
एकीकडे, टी-20 विश्वचषकातील सर्वात वयस्कर खेळाडूचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर याच स्पर्धेत सर्वात तरुण खेळाडू नेपाळचा गुलशन झा (Gulshan Jha) असेल, ज्याचे वय फक्त 18 वर्षे 77 दिवस आहे.
नेपाळकडून खेळताना गुलशनने 2021 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने नेपाळसाठी आतापर्यंत 29 टी-20 सामन्यांमध्ये 19 विकेट घेण्यासोबतच 362 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, त्याने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 विकेट घेण्यासोबतच 514 धावाही केल्या आहेत. गुलशन हा गोलंदाज असला तरी त्याची कामगिरी पाहता त्याला अष्टपैलू म्हणणे चुकीचे ठरणार नाही.







